बहुतांश सार्वजनिक बँकांनी कर्जाच्या व्याजाचे दर कमी करून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणाचा फायदा सामान्य लोकांना दिलेला नाही किंबहुना ते हात आखडता घेत आहेत, अशा शब्दांत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी सार्वजनिक बँकांना खडे बोल सुनावले. कर्जदार बँकांनी व्याजाचे दर लवकर कमी करावेत असेही त्यांनी सांगितले.
रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाच्या कार्यक्रमानंतर बोलताना जेटली यांनी वरील वक्तव्य केले. ते म्हणाले, आम्ही सार्वजनिक बँकांवर व्याजदर कमी करण्याबाबत दबाव आणत नाही, पण त्यांनी व्याजदर कमी करावेत अशी आमची अपेक्षा आहे व त्यात काहीही वावगे नाही. दरम्यान, आगामी काळातील दरकपातीबाबत बोलताना रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, चलनवाढीचा आलेख त्या वेळी कसा असेल यावर बरेच काही अवलंबून आहे. अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे महागाईवर कितपत परिणाम होतो याचे काळजीपूर्वक निरीक्षण आम्ही करीत आहोत. दरम्यान, उद्योगांना व पायाभूत प्रकल्पांना निधी मिळावा यासाठी सेबीने काही योजना जाहीर केल्या असून त्यात पालिकांची बंधपत्रे, दुबई व सिंगापूरच्या धर्तीवर जागतिक आर्थिक केंद्र सुरू करण्याचा त्यात समावेश आहे. बाजारपेठ नियंत्रक संस्था असलेल्या सेबीने काही कंपन्यांचे कर्ज समभागात रूपांतरित करण्याचे ठरवले असून बाजारपेठेत काही गोष्ठी घडवून आणण्याच्या प्रकारांना चाप लावण्यासाठी नियंत्रणे घातली आहेत.

Story img Loader