दूरसंचार क्षेत्रातील स्पेक्ट्रम लिलावास अपेक्षेएवढा प्रतिसाद लाभलेला नसला तरी आर्थिक वाढीसाठी सरकार सर्व ती आवश्यक पावले उचलीत असून वित्तीय तूटही कमी होईल, असे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांनी शुक्रवारी येथे एका पत्रकार परिषदेत सांगितले.
अजून आपल्या हाती बराच अवधी असून घाबरून जावे किंवा अस्वस्थ व्हावे असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी नमूद केले. निर्गुतवणुकीची प्रक्रिया सुरू होईल आणि स्पेक्ट्रम लिलावाचीही प्रक्रिया चालूच राहील, असे चिदंबरम् म्हणाले. ‘टूजी स्पेक्ट्रम’ लिलावामधून सरकारला ४० हजार कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना केवळ नऊ हजार ४०७ कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याच्या पाश्र्वभूमीवर चिदंबरम् बोलत होते.विद्यमान आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या हाती अजून साडेचार महिन्यांचा अवधी शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीत अपेक्षित लक्ष्य साधले जाणार नाही, असे म्हणणे घाईचे ठरेल. हे लक्ष्य साधण्याची आपली इच्छा आहे, असेही चिदंबरम् यांनी सांगितले. खासगी क्षेत्रात ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची सरकारची योजना असल्याची माहिती त्यांनी दिली.
अर्थव्यवस्थेच्या कूर्मगतीबद्दल बोलताना, अर्थव्यवस्थेला आव्हानात्मक परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. मात्र, आर्थिक विकासासाठी सरकार अनेक पावले उचलीत आहे. सध्या युरोझोन आर्थिक मंदीच्या लाटेत सापडला असला तरी आपण त्या परिस्थितीच्या आसपासही नाही. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर साडेपाच टक्के आहे, असे त्यांनी सांगितले. पुढील वर्षांचा अर्थसंकल्प अधिक समतोल असेल, असे संकेत चिदंबरम् यांनी दिले.   

Story img Loader