नवी दिल्ली : निवासी जागा भाडेतत्वावर खासगी व्यक्तींना वैयक्तिक वापरासाठी दिल्यास त्यावर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू होणार नाही, असे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. भाडेकरूंनी दिलेल्या घरभाडय़ावर १८ टक्के जीएसटी लागू होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे  सांगण्यात आले.

निवासी जागा जेव्हा व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली जाईल, त्याचवेळी मिळणाऱ्या भाडय़ावर जीएसटी आकारला जाईल, असे सरकारने ट्वीटच्या माध्यमातून स्पष्ट केले. वैयक्तिक वापरासाठी खासगी व्यक्तीला भाडय़ाने दिल्यावर जीएसटी लागू होणार नाही. तसेच मालक किंवा भागीदाराने वैयक्तिक वापरासाठी निवासस्थान भाडय़ाने दिले तर त्यावर जीएसटी लागणार नसल्याचे त्यात म्हटले आहे. केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिल्याने वैयक्तिक वापरासाठी स्थावर मालमत्ता भाडय़ाने घेणाऱ्या लोकांसाठी देखील ही दिलासादायक बाब आहे, असे केपीएमजीचे अभिषेक जैन यांनी सांगितले.

Story img Loader