वधारलेल्या काहीशा औद्योगिक उत्पादनाने तसेच तब्बल दोन वर्षांच्या नीचांकाला येऊन ठेपलेल्या किरकोळ महागाई दराने २०१४ ची सुरुवात झाली असली तरी नवे आर्थिक वर्ष मात्र चढय़ा व्याजदराचेच राहिल, अशी भिती व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेच्या आगामी पतधोरणास जवळपास दिड महिन्याचा कालावधीत शिल्लक असताना त्यातही यंदा व्याजदर कपात होणार नाही, असे मत विविध विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
जानेवारीप्रमाणेच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे यंदाही मुख्य व्याजदर स्थिर ठेवतील, असा सूर अर्थविश्लेषकांमधून व्यक्त होत आहे. जानेवारीत औद्योगिक उत्पादन दर किरकोळ, ०.१ टक्के वधारला आहे. तर फेब्रुवारीतील किरकोळ महागाई दर ८.१ टक्के या गेल्या २५ महिन्याच्या तळात विसावला आहे.
याबाबत केअर या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की, महागाई आणखी कमी होईल आणि म्हणून विकासाला चालना देण्यासाठी तूर्त व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले जातील, असे संस्थेने नमूद केले आहे. व्याजदर कपातीबाबत कोणतेही भाष्य न करता उलट रिझव्र्ह बँकेकडून १ एप्रिलच्या पतधोरणात सध्याच्या चढय़ा दरांवरच समाधान मानावे लागेल, असे ‘एचएसबीसी’ या विदेशी ब्रोकरेज कंपनीने म्हटले आहे. ‘क्रिसिल’नेही किरकोळ महागाई दर कमी झाला असला तरी अन्नधान्याचा महागाई दर चढाच असल्याने तूर्त व्याजदर कपातीच्या शक्यतेबाबत साशंकता व्यक्त केली आहे. ‘क्रेडिट सूस’ने येत्या सप्टेंबपर्यंत व्याजदराबाबत फार काही बदल होणार नाहीत, असे नमूद करत तोपर्यंत उलट पाव टक्के व्याजदर वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. येत्या डिसेंबर-जानेवारी दरम्यान मात्र महागाई दर ६ टक्क्य़ांपर्यंत खाली येईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. महागाईची जोखिम अद्यापही कमी झाली नसल्याचे मत व्यक्त करून बीएनपी पारिबासने रिझव्र्ह बँक अद्यापही व्याजदर चढेच ठेवू शकते, असे म्हटले आहे.
मुख्य आर्थिक सल्लागार पद भूषविणाऱ्या राजन यांची ४ सप्टेंबर २०१३ रोजी रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी तीन वेळा पाऊण टक्क्य़ांची वाढ करत रेपो दर ८ टक्क्य़ांवर नेऊन ठेवला. पतधोरण निश्चितीसाठी किरकोळ महागाई दर महत्त्वाचा मानणाऱ्या मध्यवर्ती बँकेने जानेवारी २०१५ पर्यंत तो ८ टक्क्य़ांपर्य्त खाली येईल, असा विश्वास यापूर्वीच व्यक्त केला आहे.

Story img Loader