सोने खरेदीसाठी खातेदारांना कर्ज देऊ नये, असे फर्मान भारतीय रिझव्र्ह बँकेने अन्य वाणिज्य बँकांना बजाविले आहे. धातू, दागिने, नाणी अथवा यूनिट (गोल्ड ईटीएफ) प्रकारातील सोने खरेदीसाठी ग्राहकांना वित्तीय पुरवठा करू न देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
सोन्यासाठी कर्ज घेणाऱ्या वित्तसंस्थांवर मर्यादा घातल्यानंतर मध्यवर्ती बँकेने आता थेट खरेदीदारांवर बडगा उगारला आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या तिमाही पतधोरणात रिझव्र्ह बँकेने सोने कर्ज घेणाऱ्या वित्तसंस्थांवरही बंधने घातली होती. वित्तसंस्थांनी खरेदी केलेल्या एकूण सोन्यापैकी केवळ ६५ टक्क्यांपर्यंतचे कर्ज मिळण्याचा पर्याय दिला होता.
मौल्यवान सोने धातू खरेदीमुळे पिवळ्या धातूची आयातही वाढत असून त्याचा परिणाम देशाच्या चिंताजनक बनलेल्या वित्तीय तुटीवरही होत आहे. यासाठी सोने वापर कमी होण्याच्या दृष्टीने सरकारमार्फत वेळोवेळी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचेच आगामी पाऊल म्हणून सोने खरेदी करण्यासाठी जर कुणी ग्राहक कर्ज घेत असेल तर त्याला ते देऊ नये, असेच रिझव्र्ह बँकेने अन्य बँकांना सांगितले आहे.
रिझव्र्ह बँकेच्या या निर्णयाचा सराफा व्यवसायावर फार काही विपरित परिणाम होणार नाही. सोन्यासाठी वित्तीय सहकार्य घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे एक टक्काच आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष कुमार जैन यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा