थकीत कर्जाचे गंभीर पातळीवर प्रमाण एकदम कमी करणारी कोणतीही जादूची काडी आपल्याकडे नाही, असे प्रतिपादन देशातील सर्वात मोठय़ा भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मंगळवारी येथे केले. सध्या शेअर बाजारात जशी उसळी दिसत आहे तशी उभारी सकल राष्ट्रीय उत्पादन दिसताच बँकेच्या स्थितीतही या संबंधाने सुधार दिसेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
स्थापनेची ६० वर्षे पूर्ण करण्याच्या निमित्ताने स्टेट बँकेद्वारे आयोजित ‘एसबीआयइनटच’ या अद्ययावत तंत्रज्ञान सेवेचा शुभारंभ नवी दिल्लीत झाला. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते या वेळी सहा विविध डिजिटल शाखांचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी बुडीत कर्जाबद्दल विचारले असता भट्टाचार्य यांनी काहीशा उद्वेगाने प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, वाढत्या बुडीत कर्जाचा ताण बँकेवर आहेच. मात्र ते एकदम कमी करणारी माझ्याकडे कोणतीही यंत्रणा नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत. एकदा का अर्थव्यवस्थेत मागणी वाढली की सारेच चित्र पालटेल. वाढत्या कर्जाबाबतची आव्हाने आम्ही चांगलेच जाणून आहोत आणि ती पेलण्याच्या दिशेने आमचे प्रयत्नही सुरू आहेत. निधी उभारणीचे वृत्तही त्यांनी फेटाळून लावले. तूर्त पतपुरवठा वाढ लक्षात घेऊन नंतरच पावले उचलली जातील, असे त्या म्हणाल्या. सध्या कर्जासाठी मागणी नसल्याने तातडीच्या निधी उभारणीची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. पत मागणी वाढल्यास निधी उभारणीचे पर्याय बँकेसमोर असतील, असे त्या म्हणाल्या.
मार्च २०१४ अखेर बँकेच्या बुडीत कर्जाची रक्कम ६१,६०५.३५ कोटी रुपयांवर गेली आहे. एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत हे प्रमाण ४.९५ टक्के आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत ते ४.७५ टक्के होते. यामुळे गेल्या आर्थिक वर्षांत बँकेचा निव्वळ नफाही १०,८९१.१७ कोटी रुपयांवर आला.
५,००० एटीएम स्थापित करणार
मुंबई : चालू आर्थिक वर्षांत स्टेट बँक ५ हजार नवे एटीएम उभारणार असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. कृष्ण कुमार यांनी मंगळवारी मुंबईत दिली. याचबरोबर बँकेच्या १ हजार शाखांची भर या दरम्यान पडेल, असेही ते म्हणाले. मार्च २०१४ अखेर बँकेचे देशभरात ४३,५१५ एटीएम आहेत. असे असूनही स्टेट बँकेचे खातेदार अन्य बँकांच्या एटीएमचा वापर करीत असल्याबद्दल बँकेला भरावे लागणाऱ्या आंतरशुल्काची रक्कम मोठी आहे. स्टेट बँकेने यापोटी गेल्या आर्थिक वर्षअखेर ९९१ कोटी रुपये भरले आहेत.