राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकास कार्यक्रमांसाठी यंदा भरीव म्हणजे जवळपास १३०० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासीबहुल नाशिक जिल्ह्याला यातून अधिकाधिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. अर्थसंकल्पात आदिवासी भागातील गावे, वाडय़ा व वस्त्यांच्या विकासासाठी ‘ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युतीकरण, रस्ते व गटारांचे बांधकाम तसेच इतर मूलभूत सुविधा उपल्ध करून देण्यात येतात. आगामी वर्षांत या योजनेसाठी २४५.२३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. या वाडय़ा-वस्त्यांना वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पाने आगामी वर्षांसाठी ८२.८९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आदिवासी भागातील शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविण्यासाठी इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या ‘सुवर्ण महोत्सवी आदिवासी शिष्यवृत्ती योजने’करिता २०१३-१४ सालासाठी २०३.६८ कोटींची तरतूद केली गेली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या ४३७ आश्रमशाळांपैकी आणखी १८६ शाळांच्या इमारती व वसतिगृहांच्या बांधकामाकरिता अर्थसंकल्पात ५०१.३८ लाख रुपयांची तरतूद केली गेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा