चेन्नई येथे नोकियाचा भारतातील सर्वात मोठा मोबाइल निर्मिती प्रकल्प असून, येथील उत्पादन यंत्रणा व्हिएतनाममध्ये हलविण्यात आली आहे.
तामिळनाडू राज्य सरकारबरोबरच्या कर संघर्षांत अडकलेल्या नोकियाने आपल्या चेन्नईस्थित प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. या स्वेच्छानिवृत्तीचा किती कर्मचारी लाभ घेतील, याबाबत नेमका आकडा मात्र कंपनीने सांगितलेला नाही. तथापि येथून उत्पादन होणाऱ्या ‘आशा’ मालिकेतील मोबाइल फोनची निर्मिती आता भारताबाहेरून होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कंपनी नेहमीच आपल्या व्यवसाय व ध्येयधोरणाचा आढावा घेत असते व त्यानुरूप आर्थिक, मनुष्यबळ रचनेत बदल करते, असे नोकियाने या संबंधाने भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यमान कर्मचाऱ्यांना लाभ होण्यासाठीच यंदा अत्यंत आकर्षक स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना तरतुदींनुसार सर्व लाभ दिले जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
मूळची फिनलॅण्डची असलेल्या नोकियात ६ हजारांहून अधिक पूर्णवेळ कर्मचारी आहेत. पैकी ३ हजार कर्मचारी हे ‘नोकिया इंडिया एम्प्लॉईज युनियन’शी संलग्न आहेत. चेन्नई येथील नोकियाचा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा मोबाइल निर्मिती प्रकल्प आहे. मात्र येथील उत्पादन निर्मिती यंत्रणा आता व्हिएतनाममध्ये हलविण्यात आली आहे. त्यामुळे एरवी महिन्याला तयार होणाऱ्या १.३ कोटी मोबाइल संचाची संख्या आता ४० लाख प्रति महिन्यावर आली आहे. येथे तीन पाळ्यांमध्ये तयार होणारा आशा मोबाईल आता केवळ दोन पाळ्यांमध्येच तयार केला जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा