नोकियाने आपल्या संपूर्ण हँडसेट्सच्या व्यवसायाचे जागतिक सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टला हस्तांतरण पूर्ण केले असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. तथापि या व्यवहारातून तिने भारतातील चेन्नई येथील निर्मिती प्रकल्प मात्र वगळला असल्याचे स्पष्ट केले.
भारतात या प्रकल्पासंबंधाने करविषयक तिढा सुरू असल्याने मायक्रोसॉफ्टबरोबर झालेल्या व्यवहाराच्या कक्षेबाहेर हा प्रकल्प ठेवण्यात आला होता. आता हा व्यवहार तडीस गेल्याने, उभय पक्षांनी चेन्नई प्रकल्पासंबंधाने वेगळ्या सेवा-शर्ती आखून स्वतंत्र करारही केल्याचे नोकियाने स्पष्ट केले आहे. सुमारे महिनाभराच्या विलंबाने मार्गी लागलेल्या या व्यवहारातून नोकियाला यापूर्वी जाहीर झालेल्या ५.४४ अब्ज युरो म्हणजेच साधारण ४३२ अब्ज रुपयांच्या मूल्यांकनापेक्षा किंचित अधिक अर्थलाभ होणे अपेक्षित आहे. सरलेल्या सप्टेंबर २०१३ मध्ये नोकियाने आपला संपूर्ण उपकरणे व सेवा व्यवसाय मायक्रोसॉफ्टला विक्री करीत असल्याचे घोषित केले होते. जगातील बडय़ा निर्मिती प्रकल्पापैकी एक असलेला नोकियाचा चेन्नईस्थित उत्पादन प्रकल्प मात्र यापुढे विशिष्ट सेवा करारांतर्गत मायक्रोसॉफ्टसाठी फोन उपकरणांची निर्मिती करेल.
उभयतांच्या व्यवहारातून नोकियाचा दक्षिण कोरियामधील मसानस्थित प्रकल्पही वगळण्यात आला आहे. मसान प्रकल्पात २०० कर्मचारी कार्यरत असून, तो लवकरच बंद केला जाणार आहे. तर चेन्नई प्रकल्पात सध्या सहा हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना स्थायी स्वरूपाचा रोजगार दिला जात आहे.
मायक्रोसॉफ्टने शुक्रवार, २५ एप्रिलपासून नोकियाच्या विद्यमान ग्राहकांच्या सेवाविषयक दायित्वाचा स्वीकार करीत असल्याचे तसेच जगभरातील २५ हजारांच्या घरात असलेल्या कर्मचारी ताफ्याला आपल्या सेवेत सामावून घेत असल्याचे जाहीर केले आहे. नोकियाचा हँडसेट व्यवसाय ताब्यात घेऊन मायक्रोसॉफ्टने तब्बल ३००० अब्ज रुपयांच्या किफायती मोबाइल फोन बाजारपेठेत नव्याने मार्गक्रमण सुरू केले आहे.

Story img Loader