नोटबुक आणि टॅबलेटच्या वाढत्या मागणीने संगणकांची भारतातील मागणी रोडावली असून २०१४ च्या पहिल्या तिमाहीत २०.३० लाख संगणक विक्री झाली आहे. जानेवारी ते मार्च २०१३ मधील २७.१० लाख संगणक मागणीच्या तुलनेत हे प्रमाण २५ टक्क्यांनी घसरले आहे.
‘आयडीसी’ने केलेल्या संशोधनात संगणक क्षेत्रातील यंदाचा प्रवास हा गेल्या तीन ते चार वर्षांतील सुमार असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र येत्या वर्षभरात पुन्हा हा व्यवसाय वेग घेईल, असाही आशावाद ‘आयडीसी इंडिया’चे बाजार विश्लेषक मनीष यादव यांनी व्यक्त केला आहे.
संगणकांच्या तुलनेत हाताळण्यास योग्य म्हणून नोटबुक, लॅपटॉपचा विचार ग्राहकांकडून अधिक केला जातो. त्याचबरोबर चलन अस्थिरता आणि वाढत्या किमती यांचाही परिणाम संगणकांच्या विक्रीवर नोंदला गेला आहे. दुसऱ्या तिमाहीनंतर, सणांच्या पाश्र्वभूमीवर त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
घरगुती वापरासाठीच्या संगणकांची विक्री यंदाच्या पहिल्या तिमाहीत १०.१० लाख झाली आहे. यातही डिसेंबरअखेरच्या तिमाही तुलनेत ४.३ टक्के घसरण झाली आहे, तर व्यवसाय वापरासाठीच्या संगणकांची संख्या मार्चपर्यंत १०.२० लाख राहिली आहे. यात मात्र ४.१ टक्के वाढ झाली आहे.
एचपीला मागे सारून डेलचा वरचष्मा
भारतीय संगणक बाजारपेठेत एचपीला मागे सारत डेलने सर्वाधिक बाजारहिश्शाचे स्थान मिळविले आहे. जानेवारी ते मार्च २०१४ या तिमाहीत डेलचा बाजारहिस्सा सर्वाधिक २३.१० टक्के राहिला आहे. संपूर्ण २०१३ मध्ये देशात संगणक विक्रीत पहिल्या क्रमांकावर राहिलेली एचपी २०.४० टक्के बाजारहिश्शासह दुसऱ्या स्थानावर राहिली आहे. तर तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे लिनोवा व एसरचे स्थान राहिले आहे. त्यांचा बाजारहिस्सा १४.९ व १०.९ टक्के आहे.

Story img Loader