सिनेमॅक्स इंडियावर ताबा घेणारी पीव्हीआर सिनेमा ही कंपनी देशातील सर्वात मोठी सिनेमागृहांची साखळी चालविणारी कंपनी बनणार आहे. सिनेमॅक्सच्या ६९.२७ टक्के हिस्सा संपादित करून पीव्हीआर सिनेमाने त्या कंपनीच्या १३८ पडद्यांच्या मालमत्तेवर ताबा मिळविला आहे. पीव्हीआर आपल्या सिने हॉस्पिटॅलिटी या उपकंपनीमार्फत ३९४.९८ कोटी रुपयांचा हा व्यवहार पूर्ण करणार आहे. पीव्हीआरकडून सिनेमॅक्सचा उर्वरित २६ टक्के हिस्साही किरकोळ गुंतवणूकदारांना खुल्या प्रस्तावाद्वारे मिळविणार आहे. उभय कंपन्यांनी तसे अधिकृतरीत्या भांडवली बाजारालाही कळविले आहे.
सिनेमॅक्सच्या प्रति समभाग २०३.६५ रुपये दराने मोबदला देऊन हा व्यवहार पीव्हीआर सिनेमा पूर्णत्वास नेणार आहे. मुंबई शेअर बाजारातील सध्याच्या समभाग मूल्यापेक्षा १५ टक्के अधिमूल्य देणारी ही खरेदी रक्कम आहे. सिनेमॅक्सच्या समभागाला गुरुवारी ४.९९ टक्के अधिक, १८४.२५ रुपयांचे मूल्य मिळाले. तर पीव्हीआरचा समभाग मुंबई शेअर बाजारात तब्बल ७.८३ टक्क्यांनी वधारून २५५.४५ रुपयांवर गेला. सिनेमॅक्सच्या ताबा प्रक्रियेनंतर पीव्हीआर जवळपास ३५० सिनेमागृहांसह देशातील सर्वात मोठी प्रेक्षकगृहांची साखळी बनणार आहे. जमेची बाब म्हणजे सिनेमॅक्सची मुंबईतच १४ ठिकाणी ४५ सिनेगृहे आहेत. तर फेम इंडिया ( आणि बिग सिनेमा अनुक्रमे २५६ आणि २५४ सिनेमागृहांसह दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. २००५ च्या सुमारास अनिल अंबानी प्रवर्तित रिलायन्स मिडिया वर्क्‍सने अ‍ॅडलॅब्जची सिनेमागृहे खरेदी केली होती. तर २०१० मध्ये आयनॉक्सने फेम इंडियाच्या सिनेमागृहांवर ताबा मिळविला होता.    
  कंपनी    मालमत्ता    पडदे     आसने
पीव्हीआर      ४६    २१३    ५०,६५५    
सिनेमॅक्स      ३९    १३८    ३३,५३५
एकूण      ८५    ३५१    ८४,१९०

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिनेगृह झळकले!
पीव्हीआरचे समभाग मूल्य दिवसभरात १६ टक्क्यांनी वधारून वर्षांच्या उच्चांकाला पोहोचले होते. पीव्हीआर सिनेमॅक्समधील उर्वरित २६ टक्के हिस्सा समभाग खरेदी करून मिळविणार आहे. यासाठी १.०६ कोटींहून अधिक समभागाकरीता प्रति समभागमूल्य २४५ रुपये मोजणार आहे.
पीव्हीआर     रु. २५५.४५     ७.८%
सिनेमॅक्स    रु. १८४.२५     ५%
रिलायन्स मी.    रु. ८२.४०     ८.६%
आयनॉक्स    रु. ८३.८०     ५%

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now pvr company is biggest cinema theaters in india by take overing cinemax