वर्षांच्या प्रारंभीच घाऊक महागाई दराने शून्याखालील उल्लेखनीय कामगिरी बजाविल्यानंतर व्याजदर कपातीची अपेक्षा आता अधिक उंचावली आहे. त्याचबरोबर यंदा त्याचे प्रमाण वाढण्याची आशाही उद्योग स्तरावरून व्यक्त होत आहे.
रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी पतधोरणापूर्वी, १५ जानेवारी रोजी अचानक रेपो दरात पाव टक्क्य़ाची कपात केली होती. विकास दर आणि महागाईचे आगामी आकडे पाहून पूरक परिस्थिती असल्यास पुढील पतधोरणापूर्वीही व्याजदर कपात केली जाऊ शकते, असे संकेतही गव्हर्नरांनी ऐन पतधोरणाच्या वेळी स्थिर व्याजदर ठेवत दिले होते. रिझव्र्ह बँकेचे आगामी पतधोरण नव्या आर्थिक वर्षांचे असेल. तेही चालू महिनाअखेर जाहीर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरचे. तेव्हा २८ फेब्रुवारीचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर व ७ एप्रिलच्या पतधोरणापूर्वीही व्याजदरात कपात होऊ शकते हे आताच्या कमी झालेल्या महागाईने शक्य आहे. तेव्हा यंदा ती किमान अध्र्या टक्क्य़ाची असावी, असा मागणीचा सूरही व्यक्त होत आहे.
जानेवारीतीलच पाच टक्क्य़ांच्या वर राहिलेला किरकोळ महागाई दर गेल्याच आठवडय़ात जाहीर झाला. आता घाऊक महागाईतील मोठा उतारानेही व्याजदर कपातीच्या आशा अपेक्षा उंचावल्या आहेत.
‘पीएचडी चेंबर’ने याबाबत नमूद केले आहे की, रिझव्र्ह बँकेच्या यापूर्वीच्या पाव टक्के व्याजदर कपातीने कमालीचा उत्साह अर्थव्यवस्थेत संचारला. यामुळे आता मागणीही वाढू लागली आहे. ताज्या महागाईच्या आकडेवारीमुळे तर आम्ही आता एक टक्क्य़ांची अपेक्षा व्यक्त करत आहोत. नवे आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी हे व्हायला हवे, असेही चेंबरचे अध्यक्ष आलोक श्रीराम यांनी म्हटले आहे.
रिझव्र्ह बँकेने जानेवारी २०१६ पर्यंत महागाईचे ६ टक्क्य़ांचे उद्दिष्ट राखलेोहे. दरम्यानच्या मान्सून व आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत असल्यामुळे महागाई आगामी कालावधीत कमीच असेल, असा मध्यवर्ती बँकेचा विश्वास आहे.
‘इक्रा’च्या वरिष्ठ अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या की, यंदा महागाईचा दर कमी होण्यासाठी धान्य आदींच्या वस्तूंच्या किंमती कमी होण्याचा हातभार लागला आहे. इंधन, खनिजाच्या किंमतीही यंदा काहीशा घसरल्या आहेत. माझ्या मते, किरकोळ महागाई दर कमी झाल्याशिवाय व्याजदरात आणखी कपातीची अपेक्षा धरणे चुकीचे ठरेल.
फिक्कीच्या अध्यक्षा ज्योत्सा सुरी यांनी सांगितले की, अर्थ व उद्योगाला चालना देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर रिझव्र्ह बँक निश्चितच व्याजदरात कपात करण्याचे धोरण अवलंबेल, असा आम्हाला विश्वास आहे.
‘असोचेम’चे अध्यक्ष राणा कपूर यांनी, सध्या कमी होत असलेल्या महागाई दराचा पूर्ण लाभ घ्यावयाचा झाल्यास रिझव्र्ह बँकेने किमान एक टक्क्य़ा तरी व्याजदर कपात करायला हवी, असे नमूद केले आहे. त्याशिवाय अर्थव्यवस्थेला गती व गुंतवणुकीचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही, असेही ते म्हणाले.
आता अर्धा टक्का व्याजदर कपात हवी!
वर्षांच्या प्रारंभीच घाऊक महागाई दराने शून्याखालील उल्लेखनीय कामगिरी बजाविल्यानंतर व्याजदर कपातीची अपेक्षा आता अधिक उंचावली आहे.
First published on: 17-02-2015 at 10:44 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now want half percent reduction in interest rate