देशाची अर्थगती लवकर पूर्वपदावर येण्याबाबत रिझव्र्ह बँकेने गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालात व्यक्त केलेल्या आशावादाने शेअर बाजारात शुक्रवारच्या सप्ताहाअखेरच्या दिवसातील व्यवहाराला उत्साह प्रदान केला. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ने इतिहासात प्रथमच ७,९००चा टप्पा ओलांडला, तर ‘सेन्सेक्स’ही आपल्या अभूतपूर्व उच्चांकापासून किंचित खाली तरी ५९ अंशांच्या वाढीसह २६,४१९.५५ वर स्थिरावला.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या प्रमुख जॅनेट येलेन यांच्या जॅक्सन होल येथील प्रस्तावित भाषणाबद्दलच्या उत्सुकतेने स्फुरलेल्या जागतिक बाजारांनी स्थानिक बाजारातील व्यवहारांसाठी सकारात्मक वातावरण बनविले. विशेषत: अमेरिकेतील अर्थस्थितीविषयक ताजे आकडेवारीतील अनुकूलता पाहता, भारतीय आयटी कंपन्यांच्या समभागांचे निर्देशांकांच्या तेजीत मोठे योगदान राहिले.
संस्थांत्मक गुंतवणूकदारांसह, वैयक्तिक गुंतवणूकदारांच्या बाजारातील उलाढालीही वाढत असून, निवडक मिड-कॅप समभागांना निरंतर मिळत असलेली मागणी हे स्पष्ट करते. विदेशी गुंतवणूकदारांकडून बाजारात निरंतर खरेदी सुरू आहे. शेअर बाजाराकडे उपलब्ध प्रारंभिक माहितीनुसार गुरुवारी त्यांच्या खरेदीचे प्रमाण हे ४१२.७७ कोटींचे होते, जे तेवढय़ाच प्रमाणात शुक्रवारीही कायम राहिले. स्मॉल कॅप समभागांमध्ये छोटय़ा गुंतवणूकदारांनी चढलेल्या भावात विक्री करून, नफा पदरी पाडून घेतल्याचे दलालांचे निरीक्षण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा