एका वर्षांच्या खंडानंतर विक्रीस आलेल्या राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ अर्थात एनटीपीसीच्या करमुक्त रोख्यांची बुधवारपासून खुली विक्री सुरू होत आहे. चालू आर्थिक वर्षांत विक्रीला येणाऱ्या विविध सात सार्वजनिक उपक्रमांच्या एकूण ४०,००० कोटी रुपयांच्या करमुक्त रोख्यांपैकी ही पहिली १००० कोटी रुपयांची रोखे विक्री आहे.
काही आठवडय़ांपूर्वी खासगी स्वरूपातील ३०० कोटींच्या रोखे विक्रीला अभूतपूर्व प्रतिसादानंतर, एनटीपीसीच्या उर्वरित ७०० कोटींच्या खुल्या विक्रीला बुधवारपासून प्रारंभ करीत आहे. किरकोळ व्यक्तिगत गुंतवणूकदरांना दहा वर्षांसाठी व्याजाचा दर ७.३६ टक्के, १५ वर्षांसाठी ७.५३ टक्के व २० वर्षांसाठी ७.६२ टक्के मिळणार आहे. १० लाखांहून कमी रकमेच्या रोख्यांसाठी अर्ज करणारे गुंतवणूकदार किरकोळ गुंतवणूकदार समजण्यात येणार असून एकूण विक्रीच्या ४० टक्के रोखे म्हणजे २८० कोटींचे रोखे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असून २० टक्के म्हणजे १७५ कोटी उच्च धनसंपदा वर्गासाठी राखीव असून उर्वरित हिस्सा संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी खुला राहील.
करमुक्त रोख्यांच्या व्याजाचा दर हा सरकारी रोख्यांच्या दराशी निगडित असल्याने व भविष्यात व्याजदरात रिझव्र्ह बँकेकडून कपात अपेक्षित असल्याने यानंतरची अन्य सरकारी कंपन्याच्या करमुक्त रोख्यांवर कमी व्याज मिळेल. शिवाय एनटीपीसी ही महारत्न कंपनी असून या रोख्यांची पत ‘एएए’ ही सर्वोच्च असल्याने आमच्या रोखे व समभाग दोन्हीचा गुंतवणुकीत सहभाग असलेल्या पीएमएस ग्राहकांच्या वतीने आम्ही मागणी नोंदवणार असल्याचे पीएमएस सेवा देत असलेल्या म्युच्युअल फंडाच्या प्रमुखांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
किरकोळ ग्राहकांसाठी ही विक्री २३ ते ३० सप्टेंबरदरम्यान खुली आहे. प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम वाटप या तत्त्वावर ही रोखे विक्री सुरू राहील. हे रोखे फक्त डिमॅट स्वरूपात उपलब्ध होणार असून मुंबई शेअर बाजाराच्या-‘बीएसई’च्या रोखे मंचावर सूचिबद्धतेसह त्यांचे नियमित व्यवहार होणार असल्याने ही गुंतवणूक रोकडसुलभ व तरल ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा