गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या खनिज तेलाच्या दरातील चढ आता प्रतिपिंप ५० डॉलरनजीक पोहोचू पाहत आहे. इंधन दरातील तेजीचे मात्र विविध भांडवली बाजारात स्वागत होत आहे. सध्याचे तेल दर हे २०१६ मधील सर्वोच्च टप्प्यावर आहेत.
पुढील काही दिवसांसाठी होणारे खनिज तेलाचे व्यवहार हे ४९ डॉलर प्रतिपिंपप्रमाणे होत असल्याचे सध्या स्पष्ट होत आहे. काळे सोन्याचा सध्याचा दर हा गेल्या नोव्हेंबरच्या समकक्ष आहे. मात्र लवकरच ते ५० डॉलरची पातळी ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
येत्या काही दिवसांमध्ये खनिज तेलासाठी पिंपामागे ५० डॉलर मोजावे लागल्यास आश्चर्य वाटायला नको, असे बीएमआय रिसर्चचे तेल व वायू विषयाचे विश्लेषक पिटर ली यांनी म्हटले आहे. चालू वर्षांच्या उर्वरित अर्धवार्षिकातही तेल दराचा प्रवास ४५ ते ५० डॉलर दरम्यान राहील, असेही ते म्हणाले.
गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेचे इंधन उत्पादन कमी होत आहे. याउलट चीनमध्ये इंधन उत्पादन वाढत आहे.
तेल दराने यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ३० डॉलर असा गेल्या १३ वर्षांतील तळ गाठला होता. तर जून २०१४ मध्ये तेलाचे दर १०० डॉलर प्रतिपिंपपर्यंत पोहोचले होते.

Story img Loader