पेट्रोलियम-निर्यातदार देशांच्या ओपेक (The Organization of the Petroleum Exporting Countries) या संघटनेची बैठक आणि मंदीच्या भीतीने आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी तेलाचे दर गडगडल्याचं पहायला मिळालं. बुधवारी तेल उत्पादक देशांची बैठक पार पडणार असून यामध्ये ऑगस्ट महिन्यातील इंधन दरांसंदर्भातील धोरण निश्चित केलं जाणार आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच इंधनाचे घसरलेले दर लक्षात घेत खनित तेलाच्या दरांमध्ये काही प्रमाणात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यास देशातही पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होतील असाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.
ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ६३ सेंट्सने किंवा ०.६ टक्क्यांनी घसरुन प्रती बॅरल १०३.३४ अमेरिकी डॉलर्सपर्यंत आली. अमेरिकेतील पश्चिम टेक्सासमध्ये इंटरमिडिएट क्रुड ऑइलची किंमत प्रती बॅरलमागे ९७.८७ अमेरिकी डॉलर्स इतकी घसरली. ही घसरण ७५ सेंट्स किंवा ०.७ टक्के इतकी होती. आशियामधील शेअर बाजारांमध्ये व्यापार सुरु झाला तेव्हा ही घसरण प्रती बॅरल ९७.५५ अमेरिकी डॉलर्सपर्यंत गेली.
ब्रेंट आणि डब्ल्यूटीआय या दोन्ही कंपन्यांसाठी २०२० नंतर प्रथमच तोट्यासह मासिक व्यवहार संपुष्टात आला. जुलै महिना हा या कंपन्यांसाठी तोट्याचा सलग दुसरा महिना ठरला आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये वाढती महागाई आणि उच्च व्याजदरांमुळे मंदीची भीती निर्माण झाली असून ज्यामुळे इंधनाची मागणी कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.
विश्लेषकांनीही इंधनाची मागणी कमी होत असल्याकडे लक्ष वेधलं आहे. ब्रिटनमध्ये इंधन विक्री कमी होत असून सध्या या देशात पेट्रोलची मागणी पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा कमी आहे. हे इंधनाची मागणी कमी होत असल्याचं प्राथमिक चित्र आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणातील विश्लेषकांनी एप्रिलनंतर प्रथमच २०२२ च्या सरासरी किमतींमध्ये ब्रेंटची अंदाजित किंमत ही प्रति बॅरल १०५.७५ आणि डब्ल्यूटीआयची किंमत १०१.२८ डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत असेल असं सांगितलं आहे.
ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) आणि रशियासह सहयोगी, ओपेक प्लस म्हणून ओळखला जाणारा गट, सप्टेंबरच्या उत्पादनांसंदर्भातील धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बुधवारी बैठक घेणार आहे. रॉयटर्सच्या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या ओपेकशीसंबंधित आठ पैकी दोन सूत्रांनी सांगितले की, सप्टेंबरमधील माफक वाढीवर तीन ऑगस्टच्या बैठकीत चर्चा केली जाईल, तर उर्वरित किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे.