नवी दिल्ली : अमेरिकी डॉलरची अन्य चलनांच्या तुलनेत सशक्तता आणि जागतिक मागणीच्या चिंतेमुळे काही दिवसांपूर्वीपर्यंत पिंपामागे ११० डॉलपर्यंत भडकलेल्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती कमालीच्या थंडावल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर तर जानेवारीनंतर प्रथमच पिंपामागे ९० डॉलरखाली रोडावल्या आहेत.

बुधवारच्या व्यवहारात डॉलर निर्देशांकांना सार्वकालिक उच्चांक गाठला आणि त्या परिणामी तेलाच्या वायदा किमतीलाही गळती लागली. अमेरिकी बाजाराचा तेलाच्या किमतीचा मानदंड असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट तेल’ पिंपामागे ८५ डॉलरखाली गडगडले, तर भारतासह बहुतांश जगासाठी तेलाच्या किमतीचा मानदंड असलेल्या ब्रेंटचा दर ९० डॉलरखाली गेला. संभाव्य जागतिक आर्थिक मंदी आणि घटलेल्या मागणीने तेलाच्या बाजारावर चिंतेच सावट आहे.

चलनवाढीला रोखण्यासाठी जगात सर्वत्र मध्यवर्ती बँकांनी व्याजाचे दर वाढविणे सुरू ठेवले आहे. याचा परिणाम म्हणून अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात फसू शकते, अशी चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. दुसरीकडे चीनमध्ये, अर्थव्यस्थेच्या दृष्टीने प्रमुख प्रदेशात साथ-प्रतिबंधक उपाय म्हणून टाळेबंदी विस्तारत चालली आहे किंवा कठोर निर्बंध स्वीकारले जात आहेत.

सोमवारी तेल निर्यातदार आणि त्याच्या सहयोगी देशाच्या ‘ओपेक प्लस’ संघटनेच्या बैठकीत ऑक्टोबरपासून जगाला तेलाचा पुरवठा किंचित कमी करण्याच्या निर्णयामुळे तेलाच्या किमती वाढल्याचे दिसले होते. ऊर्जा संकट पाहता, सौदी अरबने पुढील महिन्यासाठी आशिया आणि युरोपमधील ग्राहकांसाठी धाडल्या जाणाऱ्या तेलाच्या किमती कमी केल्या. मात्र त्या परिणामी निर्माण झालेली किमतीतील तेजी अल्पजीवी ठरल्याचे बुधवारच्या नरमलेल्या व्यवहारातून दिसून आले.