१०० कोटींची गुंतवणूक * ५०० कोटींच्या उलाढालीचे उद्दीष्ट
औषध निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या ओंकार स्पेशिअ‍ॅलिटी या भांडवली बाजारातील नोंदणीकृत कंपनीचा रत्नागिरीतील चिपळूण येथे दोन टप्प्यांमधील प्रकल्प येत्या सहा महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. २१६ कोटी रुपयांचे बाजारमूल्य असणाऱ्या ओंकारतर्फे येत्या दोन वर्षांमध्ये १०० कोटी रुपयांची गुतवणूक होणार आहे. तर २०१५ पर्यंत एकूण उलाढालही ५०० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे.
१९८३ मध्ये सुरू झालेल्या ओंकारचा सध्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे औषध निर्मिती प्रकल्प आहे. कंपनीने दोन वर्षांपूर्वी महाड येथील लासा लेबोरटरी तर आता चिपळूण एमआयडीसीत दोन जागा घेतल्या आहेत. लासातील उत्पादन निर्मिती क्षमता वाढविण्यासह महाड येथील दोन्ही प्रकल्पातून येत्या सहा महिन्यात पूर्ण क्षमतेने औषध निर्मिती करण्याची कंपनीची योजना आहे. लासाद्वारे सध्याची १.५ एकर जागा लवकरच ५ एकर होणार आहे. तर चिपळूण येथून वर्षांला ४,८०० मेट्रिक टन उत्पादन घेतले जाणार आहे. येथे नव्या सहा उत्पादनांसह एकूण १७ उत्पादने घेतली जातील. यामुळे येथील मनुष्यबळही ७०० पर्यंत जाईल.
‘एपीआय’ उत्पादन निर्मितीत सध्या ६ टक्के बाजारहिस्सा असणाऱ्या ओंकारचा हा हिस्सा येत्या दोन वर्षांत २० टक्क्यांहून अधिक होईल. कंपनीची विविध १०० हून अधिक उत्पादने सन, रेनबॅक्झी, डिव्हिज, सिप्ला आदी कंपन्यांना पुरविली जातात. जानेवारी २०११ मध्ये भांडवली बाजारात प्रवेश करणाऱ्या या कंपनीने आतापर्यंत ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पहिल्या अर्धवार्षिकात कंपनीने ३५ कोटी रुपयांची उलाढाल नोंदविली आहे.
ओंकार स्पेशिअ‍ॅलिटी केमिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रविण हेर्लेकर यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘एपीआय’सारखी श्रेणी एकूण महसुलात ७० टक्क्यांहून अधिक हिस्सा राखते. तर निर्यातीत कंपनीचा १५ टक्के हिस्सा आहे. या क्षेत्रात अधिक संशोधन, अधिक खर्च, मागणीही अधिक असून यात अस्तित्व राखणारे मात्र तुलनेने फारच कमी आहेत. त्यामुळे भविष्यातील या क्षेत्राची गरज आताच ओळखून समूहाने व्यवसाय विस्ताराच्या दिशेने आतापासूनच पावले उचलली आहेत. महाड येथील विस्तार आणि चिपळूण येथील नवा प्रकल्प हा त्याचाच एक भाग असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा