बहुप्रतिक्षित ८०० मेगाहर्ट्झसाठीच्या टूजी स्पेक्ट्रम लिलावातील बोली एकमेव सिस्टेमा श्याम टेलिसव्‍‌र्हिसेसने जिंकली आहे. सीडीएमए तंत्रज्ञानावरील मोबाईल सेवा पुरवण्यासाठी आवश्यक असलेल्या दुसऱ्या फेरीतील या प्रक्रियेद्वारा सरकारला मोठय़ा निराशाजनक प्रतिसादाला सामोरे जावे लागणार आहे.
फेब्रुवारी २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने २२ पैकी रद्द केलेल्या २१ परवान्यांमुळे सोमवारी झालेल्या बोली प्रक्रियेत सिस्टेमाने ८ परिमंडळातील २४ ब्लॉकसाठीचे परवाने ३,६३९ कोटी रुपयांना मिळविले. कंपनीने ६१३.७५ कोटी रुपये यापूर्वीच जमा केले असल्याने सरकारलाही आता केवळ १,६२६ कोटी रुपयेच मिळणार आहेत.
नोव्हेंबर २०१२ मध्ये राबविण्यात आलेल्या प्रक्रिये दरम्यानच्या राखीव किंमतींच्या तुलनेत यंदा रक्कम निम्यावर असूनही गेल्या वेळच्या पाच बोलीधारकांच्याऐवजी यंदा केवळ सिस्टेमाचाच सहभाग होता. अत्यल्प प्रतिसादाने केवळ चार तासात बोली प्रक्रिया आटोपती घ्यावी लागली. सिस्टेमाच्या अनुत्सकतेमुळे मुंबईसह महाराष्ट्रात सेवेसाठी बोली आलीच नाही.
दूरध्वनी लिलावातून चालू आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपये महसूलाचे उद्दिष्ट राखणाऱ्या सरकारला जेमतेम निम्मी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
एमटीएसचे १५ हजार ग्राहक तुटणार
एमटीएस या ब्रॅन्डद्वारे सीडीएमए तंत्रज्ञानावरील सेवा पुरवठा करणाऱ्या नव्या बोली प्रक्रियेतील विजेत्या सिस्टेमाचे तीन परिमंडळातील १५ लाख ग्राहक कमी होणार आहेत. यापूर्वी रद्द झालेल्या परिमंडळापैकी कंपनीने यंदा केवळ ८ परिमंडळासाठी बोली जिंकल्याने तिची मुंबईसह महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश (पूर्व) येथील सेवा खंडित होणार आहे. एकूण २२ पैकी १० परिमंडळातील सेवा खंडित करण्याचे कंपनीने यापूर्वीच जाहीर केले आहे.
  ‘एटी अ‍ॅण्ड टी’चा भारतात पुनप्र्र्रवेश?
बिर्ला, टाटा यांच्यासह भारतीय दूरसंचार क्षेत्रात भागीदारीत व्यवसायाचा अनुभव असणारी एटीअ‍ॅन्डटी पुन्हा चाचपणी करत आहे. यासाठी मुळची ही अमेरिकन कंपनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सबरोबर सहकार्य करत असल्याची जोरदार चर्चा आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमसाठी (पूर्वाश्रमीची इन्फोटेल) एटीअ‍ॅन्डटी उत्सुक असल्याची चर्चा आहे. रिलायन्सने ४जी तंत्रज्ञानावरील वायरलेस ब्रॉडबॅन्ड सेवेसाठीचा परवाना मिळविलेला आहे. एटीअ‍ॅन्डटी बिर्ला, टाटा यांच्या भागीदारीतील व्यवसायातून यापूर्वीच बाहेर पडली होती. यानंतर या कंपनीचे नाव आयडिया सेल्युलर होऊन त्यात सर्वाधिक वाटा कुमारमंगलम बिर्ला यांच्या आदित्य बिर्ला समूहाचा राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Once again loss to governament in 2g auction