सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी आणि सध्याच्या घडीला देशातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असलेले भारतीय आयुर्विमा मंडळ अर्थात एलआयसीचा खजिना गरज पडेल तेव्हा कसाही वापरण्याची सरकारची सवय काही केल्या जात नसल्याचेच पुन्हा दिसून येते. निर्गुतवणुकीचे विद्यमान वर्षांतील ३० हजार कोटींचे लक्ष्य गाठता येणे अवघड दिसत असताना, पुन्हा एकदा याकामी ‘एलआयसी’ हे आयुध सरकारकडून वापरात येऊ घातले आहे. गेल्या वर्षी ओएनजीसी या सरकारी तेल कंपनीच्या फसलेल्या समभाग लिलावाला ऐन वेळी एलआयसीनेच हात दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समभाग खरेदीच्या माध्यमातून कोणत्याही कंपनीत ३० टक्क्यांपर्यंत गुंतवणुकीची मुभा एलआयसीला देण्यात आली आहे. सध्या ही मर्यादा कमाल १० टक्क्यांपर्यंतच आहे. निर्गुतवणुकीद्वारे निश्चित महसुली उद्दिष्ट गाठण्यासाठी धडपड करणाऱ्या करणाऱ्या केंद्र सरकारने अखेर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

विविध सरकारी तसेच खाजगी कंपन्यांमध्ये समभागाच्या रुपात सध्या १० टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्याची परवानगी एलआयसीला आहे. विशेषत: सार्वजनिक कंपन्यांमधील भागविक्री प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्यास एलआयसीलाच निर्देश देऊन ती कसर सरकार भरून काढते. एलआयसी वर्षांला या माध्यमातून ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करीत असते.

सार्वजनिक कंपन्यांमधील निर्गुतवणुकीच्या माध्यमातून सरकारने चालू आर्थिक वर्षांसाठी ३० हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट राखले आहे. यासाठी शेवटचे चारच महिने शिल्लक असताना सरकारच्या तिजोरीत अद्याप १० हजार कोटी रुपयेही जमलेले नाहीत. उर्वरित कालावधीत ही नामुष्की टाळण्यासाठीच एलआयसीच्या समभाग गुंतवणुकीची मर्यादा १० वरून थेट ३० टक्क्यांपर्यंत करण्यात आल्याचे मानले जात आहे. विमा नियामक यंत्रणेचा मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध होता. असे असताना याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय वित्त सेवा सचिव डी. के. मित्तल यांनी दिली.

हिंदुस्थान कॉपरची भागविक्री येत्या शुक्रवारी होत आहे. याद्वारे सरकारला या कंपनीतील ९.५९  टक्के हिस्सा कमी करता येईल. पाठोपाठ नाल्को, सेल, भेल, एमएमटीसी, ऑईल इंडिया या कंपन्यांमध्येही निर्गुतवणूक करण्यात येणार आहे.  

 

अर्थव्यवस्थेत अधिक निधीची गरज भासल्यास रिझव्‍‌र्ह बँकेमार्फत ती उपलब्ध करून दिली जाईल; मात्र यासाठी व्याजदर कमी करण्याचा, रोखे खरेदी तसेच खुल्या बाजारापैकी कोणता पर्याय असेल, हे आताच सांगता येणार नाही.

– के. सी. चक्रवर्ती,

‘भारतीय रिझव्‍‌र्ह बँके’चे डेप्युटी गव्हर्नर (बुधवारी दिल्लीत)

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One government insurance company can invest 30 in one company