अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत सौरऊर्जेचा सिंहाचा वाटा असून एक लाख मेगाव्ॉट सौर ऊर्जानिर्मितीची  भारतात क्षमता आहे, असा विश्वास केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा खात्याचे सह सचिव तरुण कपूर यांनी व्यक्त केला. २०१२ अखेपर्यंत २० हजार मेगाव्ॉट ऊर्जा निर्मितीसाठी भारताला ३० अब्ज युरोची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईत नुकत्याच झालेल्या ‘भारतीय इंटरसोलर परिषदे’च्या निमित्ताने ते बोलत होते. भारतीय सौरऊर्जा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर हेही यावेळी उपस्थित होते. चार दिवस चाललेल्या या परिषदेत ३,१०० हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले होते.

सह सचिव कपूर यांनी सांगितले की, ज्या प्रमाणात अंदाज केले जात आहेत त्याप्रमाणात सौरऊर्जेची जागतिक बाजारपेठ अद्यापही विकसित झाली नाही. अनेक युरोपीय देश या क्षेत्रात आघाडीवर होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये हे चित्रही बदलले. भारत आणि चीनसारख्या देशांद्वारे या क्षेत्रात आता स्पर्धा निर्माण झाली आहे. भारताने गेल्या दोन वर्षांत १० मेगा व्ॉटपासून १,०४४ मेगा व्ॉट सौर ऊर्जा निर्मितीत प्रगती केली आहे. तरीदेखील मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे. यासाठी अधिकाधिक सौरऊर्जा प्रकल्प साकारावेत म्हणून सरकारही सहकार्य करीत आहे, असेही ते म्हणाले.

कपूर यांनी सांगितले की, २०१२ अखेपर्यंत २० हजार मेगा व्ॉट ऊर्जा निर्मितीसाठी भारताला ३० अब्ज युरोची गरज आहे. देशामध्ये एक लाख मेगा व्ॉट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेच्या उभारणीची क्षमता आहे. अपारंपरिक ऊर्जा निर्मिती सध्याच्या २५ हजार मेगा व्ॉटवरून येत्या पाच वर्षांत दुप्पट, ५५ हजार मेगा व्ॉटपर्यंत नेण्याचा सरकारचा उद्देश आहे; ज्यापैकी १० हजार मेगा व्ॉट ऊर्जानिर्मिती ही सौर माध्यमातून होईल, असा अंदाज आहे. अपारंपरिक ऊर्जेत भर घालणारे हे प्रमाण अधिक होऊ शकते, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

डॉ. काकोडकर यावेळी म्हणाले की, भारताच्या सौरभवितव्यासाठी उद्योजक, संशोधक आणि उत्पादक विकासकांनी एकत्र येण्याची गरज आहे. सध्याची ऊर्जेची कमतरता पाहता सौरऊर्जेवर आधारित अधिक उपकरणे, उत्पादने तसेच सेवा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lac megawatt solar electricity production ability of india