कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात ‘नाबार्ड’मार्फत एक लाख कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचा टप्पा २०१२-१३ मध्ये गाठण्यात आला. बँकेच्या आधीच्या वर्षांतील ८१,००० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा विविध बँका, राज्य सरकारे आणि इतर संस्थांना १,०६,५६२ कोटी रुपये वितरित केले गेले. ही वाढ ३१.५५ टक्के आहे. बँकेने चालू आर्थिक वर्षांत १.३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
विविध सहकारी बँका आणि क्षेत्रीय ग्रामीण बँका (६६,१८० कोटी रुपये) यांच्या आर्थिक सहकार्यात झालेल्या वाढीमुळे (३७.८७%) यंदा कर्ज वितरण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. याचबरोबर नाबार्डची मालमत्ता गेल्या आर्थिक वर्षांत ३०,९२५ कोटी रुपयांनी वाढून (१७%) २.१३ लाख कोटी रुपये झाली आहे.
ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत बँकेने विविध राज्य सरकारना १६,२९२ कोटी रुपयांचे ग्रामीण पायाभूत कर्ज वितरित केले आहे. नाबार्ड पायाभूत विकास सहकार्यातर्गत ८६० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. ऊर्जा क्षेत्रातील कार्यासाठी या निधीचा अधिकतर उपयोग करण्यात आला आहे.
सर्वाधिक पतपुरवठय़ात नाबार्डचा हिस्सा ४९ टक्के व्यापारी बँकांचा राहिला आहे. यापाठोपाठ क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि राज्य सहकारी बँका यांचा वाटा अनुक्रमे २७ आणि १२ टक्के राहिला आहे. उत्पादन संघटना विकास फंडअंतर्गत गेल्या आर्थिक वर्षांत ७८ कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात आला आहे. याअंतर्गत मोठय़ा २८ व ७२८ प्राथमिक कृषी पतसंस्था यांना लाभ झाला.
प्रति महिला गटांना १०,००० रुपयांपर्यत कर्ज वितरण करणाऱ्या नाबार्डने ३१ मार्च २०१३ अखेपर्यंत २३९ संस्थांना १६.८१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. वॉटरशेड विकास कार्यक्रमांतर्गत नाबार्डने गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल २६३ कोटी रुपयांचा निधी पुरविला आहे. याअंतर्गत १७.८ लाख हेक्टरची जमीन ओलिताखाली आली आहे.
‘नाबार्ड’कडून एक लाख कोटींचे कर्ज वितरण
कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात ‘नाबार्ड’मार्फत एक लाख कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचा टप्पा २०१२-१३ मध्ये गाठण्यात आला. बँकेच्या आधीच्या वर्षांतील ८१,००० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा विविध बँका, राज्य सरकारे आणि इतर संस्थांना १,०६,५६२ कोटी रुपये वितरित केले गेले.
First published on: 25-04-2013 at 03:15 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One lakh crores rupees lone distribution from nabard