दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध जव्हेरी बाजारातील सोने गाळणाऱ्या विविध छोटय़ा मोठय़ा कारखान्यांच्या स्थलांतराच्या राज्य सरकारच्या आदेशाने, त्यात काम करणाऱ्या ७०,००० कारागिरांच्या रोजीरोटीवर टांगती तलवार आली आहे. सुयोग्य ठिकाणी पुनर्वसन व स्थलांतराचा कार्यक्रम सादर केल्याशिवाय, या स्थलांतराला विरोधाची भूमिका ‘इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबेजीए)’ या सराफांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेने घेतली आहे.
काळबादेवी येथील ‘गोकुळ निवास’ इमारतीला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेने सरकारला दिलेल्या अहवालात, या परिसरातील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्रचनेबरोबरीनेच, येथील इमारतींच्या छोटय़ा गाळ्यांमध्ये कार्यरत या सोने गाळणाऱ्या कारखान्यांच्या स्थलांतराचीही शिफारस केली आहे. परंतु सरकारने कोणतीही कारवाई करण्यापूर्वी पुनर्वसन व स्थलांतराचा ठोस कार्यक्रम द्यावा, अशी मागणी आयबीजेएचे अध्यक्ष मोहित कम्बोज यांनी केली आहे.
कम्बोज यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, दक्षिण मुंबईत कार्यरत या कारखान्यांना सील ठोकण्याचे काम पालिकेने सुरूही केले आहे. सुमारे १०० वर्षांपासून सुरू असलेल्या आणि सुमारे २ लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगावर तडकाफडकी सुरू झालेला हा कारवाईचा वार अनुचित असल्याचे कम्बोज यांनी स्पष्ट केले.
सोने गाळणाऱ्या कारखान्यांच्या स्थलांतराला विरोध
दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध जव्हेरी बाजारातील सोने गाळणाऱ्या विविध छोटय़ा मोठय़ा कारखान्यांच्या स्थलांतराच्या राज्य सरकारच्या आदेशाने
First published on: 06-06-2015 at 07:30 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opposition to migration