केंद्र सरकारबरोबरच्या मतभेदांना चव्हाटय़ावर आणताना, रिझव्‍‌र्ह बँकेचे मावळते गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी गुरुवारी सायंकाळी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या ‘एकला चलो’ या विधानावर शरसंधान करताना, २००९-२०१३ दरम्यान घसरलेली वित्तीय शिस्त, रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेवरील घाला आणि ढिसाळ आर्थिक धोरण हीच अर्थव्यवस्था मंदावण्याचे आणि रुपयाच्या कमजोरीची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्टपणे प्रतिपादन केले.
या वक्तव्याने गव्हर्नर-अर्थमंत्री वादाची नवी चर्चा सुरू झाली आहे.
आर्थिक विकासाला प्राधान्य द्यायचे की महागाईवर नियंत्रणाला यावरून गेल्या पाच वर्षांत अर्थमंत्र्यांशी कायम खटके उडत आलेल्या सुब्बाराव यांनी आपल्या गव्हर्नरपदाच्या कारकिर्दीत शेवटच्या जाहीर भाषणाचा रिझव्‍‌र्ह बँकेची पतव्यवस्थेची नियंत्रक म्हणून न्याय्य भूमिका समर्थपणे मांडण्याची संधी म्हणून पुरेपूर वापर केला.
१०व्या नानी पालखीवाला स्मृती व्याख्यानमालेनिमित्त बोलताना त्यांनी रुपयाच्या घसरणीला हे देशांतर्गत अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले.
सुब्बाराव म्हणाले की, आमच्या टीकाकारांनी हे लक्षात घ्यावयास हवे की, २००९-१३ या काळात सरकारकडून कायम रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत राहिला. जर सरकारने वित्तीय शिस्तीचे पालन केले असते, तर रिझव्‍‌र्ह बँकेला व्याजदर वाढीचा आसूड उगारण्याची गरजच भासली नसती.
भाषणाचा समारोप करताना सुब्बाराव यांनी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांना सणसणीत टोला लगावला.
आतापर्यंत अनेकदा अर्थमंत्र्यांनी उद्वेगाने विकासाच्या वाटेवर एकटय़ाने वाटचाल करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. परंतु ते विसरले की त्यांच्याबरोबर नेहमीच रिझव्‍‌र्ह बँक होती. पण आज नाही तर काही वर्षांनी त्यांना याची जरूर आठवण होईल. तेव्हा त्यांना उमजेल की रिझव्‍‌र्ह बँक होती म्हणूनच आपला सध्या निसरडय़ा झालेल्या वाटेवर निभाव लागला आणि त्या वेळी ते आम्हाला नक्कीच धन्यवाद देतील.

हे मीही म्हटलेच आहे!
रिझव्‍‌र्ह बँकेचे मावळते गव्हर्नर डी. सुब्बाराव यांच्या शाब्दिक हल्ल्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी ते जे काही म्हणाले तेच आपणही म्हटले असल्याचे सांगितले. मंगळवारी संसदेत भाषण करताना चिदम्बरम यांनी रुपयाच्या घसरणीला बाह्य़ जगतातील घडामोडीच नव्हे तर वित्तीय शिस्त भरकटणे आणि चालू खात्यावरील तूट भरमसाट वाढू देणारी देशांतर्गत धोरणेच जबाबदार असल्याचे प्रतिपादन केले होते. त्यांचे पूर्वसुरी प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री पदावर असतानाचा म्हणजे २००९ ते २०१२ दरम्यानच्या काळातील ढिसाळपणावर चिदम्बरम यांचा थेट कटाक्ष होता. सुब्बाराव यांच्या भाषणातूनही तीच बाब अधोरेखित झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader