पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार राबवित असलेली ‘पहल’ ही योजना जगातील सर्वात मोठी थेट निधी हस्तांतरण योजना म्हणून उदयास येत आहे. अनुदानित रक्कम थेट बँक खात्यात जमा होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील स्वयंपाकाच्या गॅससाठीचे देशभरातील लाभधारक १० कोटींच्या वर गेले आहेत.
सरकारच्या थेट निधी हस्तांतरण योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात स्वयंपाकाच्या गॅससाठीची अनुदानित रक्कम लाभार्थीच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. यासाठी ‘पहल’ ही योजना आहे. अवघ्या दोन महिन्यात या योजनेने १० कोटी लाभधारकांचा आकडा ओलांडला आहे.
पंतप्रधान मोदी यांनीही या योजनेच्या पूर्णतेसाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. लाभार्थीना थेट व परिणामकरित्या अनुदानाची रक्कम पोहोचविण्यात ही योजना यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ‘पहल’ अंतर्गत १० कोटी नागरिक जोडले गेले, असे त्यांनी ट्विट केले.
‘पहल’ म्हणजेच ‘प्रत्यक्ष हस्तांतरित लाभ’ ही योजना एकूण १५.३ कोटी गॅसधारकापैकी ६५ टक्क्य़ांपर्यंत पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय तुलनेत चीन, मॅक्सिको, ब्राझील या देशांमधील अशी थेट हस्तांतरित योजना केवळ २.२ कोटी लाभार्थीपर्यंतच पोहोचली आहे.
‘पहल’ अंतर्गत गॅस सििलडर बाजारभावाप्रमाणेच विकले जाणार असून त्यापोटी अनुदानित रक्कम कापून अन्य ग्राहकांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. १५ नोव्हेंबर २०१४ मध्ये या योजनेचा शुभारंभ सुरुवातीला देशातील ५४ जिल्ह्य़ांमध्ये झाला. तर १ जानेवा२ी २०१५ पासून ही योजना देशव्यापी बनली.
२८ फेब्रवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पपर्यंत लाभार्थी संख्या एकूण ग्राहकांच्या ८० टक्के होण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. स्वयंपाकाच्या गॅससाठीची अनुदानित रक्कम लाभार्थीच्या थेट खात्यात जमा होणार असल्याने सरकारच्या ४० हजार कोटी रुपयांपैकी १० ते १५ टक्के रक्कम बचत होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन धन योजनेनेही वर्षभरात १० कोटी खातेदारांची संख्या गाठली आहे.