केंद्र सरकारनं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या विभागानं आतापर्यंत ३ वेळा मुदतवाढ दिली आहे. सध्या या दोन्ही कार्डच्या लिकिंगसाठी ३१ मार्च ही डेडलाइन आहे. तोपर्यंत हे दोन्ही कार्ड लिंक करावे लागणार आहेत. अन्यथा पॅन कार्डच अवैध ठरवण्यात येणार आहे. पण, या संदर्भात सीबीडीटीनं नवं नोटीफिकेशन काढलं आहे. त्यातून हे स्पष्ट दिसतंय की आता यापुढे पॅन-आधार लिंकिंगसाठी नवी मुदतवाढ देण्यात येणार नाही. याशिवाय एक नवा पर्यायही सीबीडीटीनं उपलब्ध करून दिला आहे.
काय आहे नवी अट?
जर तुम्ही पॅन-आधार लिंक केलं नाही तर ३१ मार्चनंतर तुमचं पॅनकार्ड अवैध ठरेल. म्हणजेच, हे कार्ड निष्क्रिय म्हणून गृहित धरलं जाईल. पण त्यानंतरही पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जोपर्यंत तुम्ही हे लिंकिंग करणार नाहीत, तोवर मात्र तुमचं कार्ड अवैध असेल. त्यामुळे या काळात तुमच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारात पॅनकार्ड गृहित धरलं जाणार नाही.
ऑनलाइन आधार-पॅन कसं लिंक केलं जातं?
१. आयकर विभागाच्या वेबसाईटवर (https://www.incometaxindiaefiling.gov.in/home) डाव्या बाजूला ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक करावं. मात्र यासाठी आयकर विभागाच्या साईटवर तुमचे लॉग इन आयडी आणि पासवर्ड गरजेचा आहे.
२. ‘link adhaar’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल. ज्यावर तुम्हाला पॅन, आधारकार्ड नंबर, आधार कार्डवरील तुमचं नाव अशी दिलेली माहिती भरावी लागेल.
३. ही माहिती भरताना तुम्हाला ‘ i have only year of birth in adhaar card’ चा पर्याय दिसेल. जर तुम्ही आधारकार्डवर फक्त जन्मवर्षच भरलं असेल तर या पर्यायावर टिक करा.
४. ही माहिती भरुन झाल्यानंतर खाली कोड दिलेला असेल ज्याला Captcha Code असं म्हणतात. तो व्यवस्थित बघून जसाच्या तसा भरा.
५. ही माहिती पूर्णपणे भरून झाल्यानंतर खाली ‘link adhaar’ चा पर्याय दिलेला असेल त्यावर क्लिक करा जेणेकरून तुमचं आधार- पॅन लिंक होऊन जाईल.
६. 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवून आधार-पॅन लिंक झाल्याची माहिती मिळवता येते. UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवा. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.