निराशाजनक पदार्पणाची ‘सेबी’कडून दखल; गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्लेची चौकशी शक्य

मुंबई : देशातील सर्वात मोठी प्रारंभिक भागविक्रीद्वारे सूचिबद्ध झालेल्या ‘पेटीएम’चे पालकत्व असणारी कंपनी ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या समभागांचे बाजारातील पदार्पण मात्र गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास करणारे ठरले. गुरुवारी सूचिबद्धतेच्या पहिल्या दिवशी २७ टक्क्य़ांनी गडगडलेला हा समभाग, सोमवारी आणखी १३ टक्क्य़ांनी घसरला. म्हणजे दोन दिवसांत ४० टक्क्य़ांहून मोठय़ा घसरणीचा दणका त्याने गुंतवणूकदारांना दिला असून, दिवसअखेर हा समभाग १,३६० रुपयांवर स्थिरावला.

समभागाच्या पदार्पणातील या निराशाजनक कामगिरीची दखल भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’नेही घेतली असून, ही प्रारंभिक भागविक्रीची (आयपीओ) प्रक्रिया हाताळणाऱ्या गुंतवणूकदार बँकांना या संबंधाने ‘सेबी’कडून जाब विचारला जाईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे. सूचिबद्धतेला सर्वच ‘आयपीओ’मधून गुंतवणूकदारांच्या पदरी फायद्याचे दान टाकले जाईल, याची शाश्वती नसते. तरी ‘पेटीएम’च्या समभागाची पहिल्या दिवशी आजवरची सर्वात भीषण घसरण ही गंभीर ठरते आणि त्यामागील कारणे संबंधितांकडून जाणून घेण्याचा बाजार नियंत्रकांचा कल दिसून येतो. कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अथवा बँकर्समार्फत केल्या गेलेल्या कोणत्याही टिप्पणीने गुंतवणूकदारांची दिशाभूल झाली असावी काय, याचीही चाचपणी केली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘पेटीएम’च्या १८,३०० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक भव्य भागविक्रीच्या प्रक्रियेत सहभागी वेगवेगळ्या सात गुंतवणूकदार बँकांचे प्रतिनिधींकडे ‘सेबी’द्वारे चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यामध्ये मॉर्गन स्टॅन्ले, गोल्डमन सॅक्स, अ‍ॅक्सिस कॅपिटल, आयसीआयसीआय सिक्युरिटीज. जेपी मॉर्गन, सिटिबँक आणि एचडीएफसी बँक अशा देशी-विदेशी वित्तसंस्थांचा समावेश आहे.

भागविक्रीमध्ये सहभागी गुंतवणूकदारांनी प्रत्येकी २,१५० रुपये अशी समभागासाठी किंमत मोजली असून, सोमवारी मुंबई शेअर बाजारातील व्यवहार आटोपले तेव्हा तो १३.०३ टक्के घसरणीसह १,३६०.३० रुपये किमतीवर स्थिरावला होता. म्हणजे भागविक्रीच्या माध्यमातून हा समभाग मिळविणाऱ्या गुंतवणूकदारांना दोन दिवसांत प्रति समभाग ७९० रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे.

व्यापारी मूल्यात दुपटीने वाढ

पदार्पणालाच गडगडलेल्या ‘पेटीएम’च्या समभागांचे अवास्तव मूल्यांकन आणि कंपनीच्या व्यवसाय आणि भविष्यातील कामगिरीवर प्रश्न उपस्थित होत असताना, तिच्यासाठी दिलासादायी माहिती पुढे आली आहे. डिजिटल देयक आणि वित्तीय सेवा व्यासपीठ असलेल्या ‘पेटीएम’ने ३० सप्टेंबरअखेर समाप्त आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण व्यापारी मूल्यात दुपटीहून अधिक वाढ नोंदविणारी कामगिरी केल्याचे जाहीर केले आहे. म्हणजेच पेटीएम अ‍ॅपचा वापर करून जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत व्यापाऱ्यांशी सामान्य ग्राहकांच्या देयक व्यवहारांचे मूल्य हे १,९५,६०० कोटी रुपयांवर पोहचले आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत कंपनीने ९४,७०० कोटी रुपयांचे सकल व्यापारी मूल्य नोंदविले होते.

Story img Loader