कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे (EPFO) पीएफ खातेधारकांना अनेक सुविधा दिल्या जातात. याच्या मदतीने कर्मचारी भविष्यासाठी काही निधी सुरक्षित ठेवू शकतात किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी ते पीएफ खात्याअंतर्गत चांगले व्याज देखील गोळा करू शकतात. सोबतच कर्मचाऱ्यांना पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्याचा पर्याय देखील दिला जातो. त्यातच आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) काही नियमांमध्ये बदल करणार आहे. यानुसार नव्या नियमांतर्गत पीएफ खातेधारक आपल्या खात्यातून एक लाखांपर्यंतची रक्कम काढू शकतो. परंतु मेडिकल ऍडव्हान्स क्लेम अंतर्गत ही रक्कम काढता येईल. कोणत्याही कागदपत्रांशिवाय ग्राहकाला ही रक्कम मिळवता येऊ शकते.
जे गंभीर आजारांमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि ज्यांना पैशांची आवश्यकता आहे अशांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतर्फे ही सुविधा देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे कर्मचारी एक लाखांपर्यंतची रक्कम मिळवू शकतो. पण ही सुविधा मिळवण्यासाठी ग्राहकाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.
रक्कम मिळवण्यासाठी करावी लागणार ‘या’ अटींची पूर्तता
संबंधित व्यक्ती शासकीय रुग्णालय किंवा सीजीएचएस पॅनल रुग्णालयात दाखल असणे आवश्यक आहे.
खाजगी रुग्णालयाच्या बाबतीत, रुग्णाला बाहेर काढण्याची परवानगी देण्याआधी त्याची तपासणी केली जाईल.
कामाच्या दिवशी अर्ज केल्यास, पैसे दुसऱ्या दिवशी हस्तांतरित केले जातील.
पैसे कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक खात्यावर किंवा हॉस्पिटलच्या बँक खात्यावर पाठवले जाऊ शकतात.
पीएफ खात्यातून कसे काढता येतील १ लाख रुपये ?
१. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे अधिकृत संकेतस्थळ http://www.epfindia.gov.in वर जावे.
२. यांनतर ‘ऑनलाइन सेवा’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. याअंतर्गत तुम्हाला फॉर्म क्रमांक ३१, १९, १०सी, आणि १०डी हे फॉर्म भरावे लागतील.
४. यानंतर पडताळणीसाठी तुमच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाका.
५. आता ‘ऑनलाइन दावा करण्यासाठी पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करा.
६. यासह तुम्हाला ड्रॉप-डाउन मेनूमधून फॉर्म ३१ निवडावा लागेल.
७. इथे तुम्हाला पैसे काढण्याचे कारण सांगावे लागेल.
८. रक्कम प्रविष्ट करा आणि रुग्णालयाच्या बिलाची एक प्रत अपलोड करा.
९. आपला पत्ता द्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा.
तपासणीअंती सर्वकाही बरोबर आढळल्यास, ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या खात्यात ऑनलाइन पैसे पाठवले जातील.