लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (ईपीएफ) रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्यातील अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे. निधीतील अतिरिक्त उत्पन्नाच्या ५ टक्के रक्कम बाजारात व्यवहार होणाऱ्या फंडांमध्ये (ईटीएफ) गुंतविण्याच्या निर्णयावर कामगार खात्याने शिक्कामोर्तब केले आहे. आता याबाबत अर्थ खात्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (ईपीएफ) व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनेकडे ६ लाख कोटी रुपयांचा निधी हाताळला जातो. त्यावर गुंतवणूकदारांना वार्षिक ८.७५ टक्के दराने व्याजही दिले जाते. मात्र संघटनेला या निधीच्या गुंतवणुकीवर १.६० लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न होते. त्यापैकी ५ टक्के म्हणजे ८,००० कोटी रुपये बाजारात अप्रत्यक्षरीत्या गुंतविले जाणार आहे.
निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या मंगळवारच्या बैठकीवर याबाबत निर्णय घेण्यात आला. कामगार विभागाला निर्वाह निधीतील ५ ते १५ टक्के रक्कम भांडवली बाजारात गुंतविण्याबाबत अर्थ खात्याने गेल्याच महिन्यात सुचविले होते. नव्या निर्णयामुळे भांडवली बाजाराला बळ मिळण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स- निफ्टीने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत २५ टक्क्यांहून अधिक झेप नोंदविली आहे.
मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या व्यासपीठावर व्यवहार होणाऱ्या फंडांमध्ये (ईटीएफ) ही गुंतवणूक होणार आहे. कामगार संघटनांनी मात्र या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. लाखो कामगारांच्या निवृत्तीपश्चात जीवनाचा आधार असलेली कोटय़वधीची जमापुंजी शेअर बाजारासारख्या अस्थिर पर्यायांमध्ये गुंतविण्याच्या सरकारच्या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ, असे ‘सिटू’ने म्हटले आहे.

Story img Loader