देशभरातील पावणे पाच कोटींहून अधिक कामगार – कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपश्चात जीवनाची आर्थिक तरतूद असलेल्या भविष्यनिर्वाह निधी (पीएफ)चा सांभाळ करणाऱ्या कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ)ची गुरुवारी देशाच्या शेअर बाजारात पहिली पदचिन्हे उमटली. १९५१ सालच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच ईपीएफओकडून समभागांमध्ये निधी गुंतविला गेला असून, त्यासाठी एसबीआय म्युच्युअल फंडाच्या ‘एसबीआय-निफ्टी ईटीएफ’ आणि ‘एसबीआय-सेन्सेक्स ईटीएफ’ या निर्देशांकाशी संलग्न दोन ईटीएफ अर्थात एक्स्चेंज ट्रेडेड फंडांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या औपचारिक समारंभात या गुंतवणुकारंभाचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कामगारमंत्री प्रकाश मेहता, केंद्रीय भविष्यनिर्वाह आयुक्त के. के. जालान, स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, एनएसई आणि बीएसई या दोन्ही शेअर बाजारांचे उच्चपदस्थ उपस्थित होते.

गुंतवणुकीची मात्रा
१५ टक्क्य़ांवरही जाईल

’ ईपीएफओकडून चालू आर्थिक वर्षांत ५००० कोटी रुपयांचा निधी हा निवड केलेल्या ईटीएफ योजनांत गुंतविला जाईल, जो दरमहा भर पडत जाणाऱ्या पीएफ ठेवींचा केवळ ५ टक्के हिस्सा असेल. तर ईपीएफओकडे जमा संचयित ठेवींचा कोष हा ६.५ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आहे. त्या तुलनेत पहिल्या वर्षी होणारी ५००० कोटी रुपयांची गुंतवणूक ही एक टक्काही नाही. तथापि कामगारमंत्री दत्तात्रेय यांनी पुढील वर्षांत समभागांमध्ये गुंतवणुकीची मुभा देण्यात आलेली संपूर्ण १५ टक्के मात्राही वापरात येऊ शकेल, असे संकेत दिले.
अर्थ मंत्रालयाने जरी वृद्धिशील ठेवींपैकी १५ टक्के निधी समभाग पर्यायांमध्ये गुंतवणुकीची परवानगी ईपीएफओला दिली असली, तरी प्रारंभी पाच टक्के निधीच गुंतविण्याचा मानस असल्याचे भविष्यनिर्वाह निधी आयुक्त के. के. जालान यांनी स्पष्ट केले. ईपीएफओकडे दरमहा सदस्य कर्मचाऱ्यांकडून सुमारे ८२०० कोटी रुपयांचे ठेव योगदान येत असते. याचा पाच टक्के हिस्सा म्हणजे ४१० कोटी रुपये हे प्रत्येक महिन्यात निवडलेल्या ईटीएफ योजनांमध्ये तूर्तास गुंतविले जाणार आहेत.

Story img Loader