मौल्यवान धातूच्या वापरावरील र्निबधाचा काडीमात्र परिणाम सोन्याची वाढती आयात रोखण्यावर झालेला नाही. देशात गेल्या वर्षांत सोन्याची आयात १३ टक्क्यांनी उंचावली असून ती पुन्हा एक हजार टनांच्या नजीक पोहोचली आहे. मात्र जगातील सोन्यासाठी सर्वात मोठा ग्राहक म्हणून असलेले भारताचे पद शेजारच्या चीनने पहिल्यांदाच स्वत:कडे घेतले आहे.
‘जागतिक सुवर्ण परिषदे’च्या अहवालात स्पष्ट झालेला २०१३ मधील मौल्यवान धातू कल भारतातील सोने मागणी सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या र्निबधात्मक प्रयत्नांनंतरही वाढल्याचेच स्पष्ट करतो. यानुसार, देशातील सोने मागणी १३ टक्क्यांनी वाढत ती ९७५ टनापर्यंत गेली आहे. २०१२ मध्ये हे प्रमाण ८६४ टन होते. देशात सोन्यावरील र्निबध २०१३ च्या उर्वरित अर्धवार्षिकात वृद्धिंगत करण्यात आले होते. या कालावधीत चोरटी आयात मात्र वाढली.
परिषदेच्या ‘सोने मागणी कल-२०१३’नुसार दागिने मागणी ११ टक्क्यांनी वाढून ६१२.७० टन झाली आहे. तिचे मूल्य १,६१,७५०.६० कोटी रुपये आहे. तर पुनर्रचित सोने मात्र १०.७९ टक्क्यांनी कमी होऊन १००.८० टन झाले आहे. एकूण गुंतवणूक मागणी १६ टक्क्यांनी उंचावत ३६२.१० टन झाली आहे. मूल्याच्या बाबत सोने गुंतवणूक मागणी ६ टक्क्यांनी वाढून ९५,४६०.८० कोटी रुपये झाली आहे.
मागणीत चीनची भारतावर सरशी
जगातील सर्वात मोठा ग्राहक म्हणून भारताला मागे टाकत चीनने २०१३ मध्ये १,०६५.८० टन सोने आयातीचा टप्पा पार केला आहे. भारत यापूर्वी सर्वात मोठा सोने ग्राहक देश म्हणून आघाडीवर राहिला आहे. यंदा मात्र चीनने यात पुढाकार घेतला आहे. २०१२ मध्ये मात्र या देशाची सोने मागणी ८०६.८ टन होती. तर भारताची याच कालावधीतील मौल्यवान धातू मागणी अधिक, ८६४ टन होती. भारतापेक्षा चीनच्या आघाडीचा कल २०१४ मध्येही राहील, असा विश्वास ‘जागतिक सुवर्ण परिषदे’चे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षांत चीन १,००० ते १,१०० टन तर भारत ९०० ते १,००० टन सोने मागणी नोंदवील, असेही ते म्हणाले.
चोरटी आयात २०० टनांवर
* चालू खात्यावरील तूट कमी करण्यासाठी लादण्यात आलेल्या सोने आयात र्निबधामुळे उलट मौल्यवान धातूची चोरटी आयातच वाढली आहे, हे सरकारनेच कबूल केले आहे. २०१३ कॅलेंडर  वर्षांत २७१ कोटी रुपयांचे सोने देशात चोरटय़ा मार्गाने आल्याचे मंगळवारी राज्यसभेत सांगण्यात आले. जागतिक सुवर्ण परिषदेने तस्करी वाढेल, असे संकेत मागेच दिले होते आणि दरमहा १५-२० टन छुप्या रीतीने भारतात येत असल्याचा अहवाल काही महिन्यांपूर्वी दिला होता. मंगळवारी मात्र २०१३ वर्षांत एकूण तस्करी २०० टनांच्या घरात जाईल, असे परिषदेने कयास व्यक्त केला. डॉलर चुकते करून होणाऱ्या सोन्याच्या वाढत्या आयातीपोटी पडणारा रुपयांवरील ताण कमी करण्याकरिता २०१३ च्या उत्तरार्धात सोन्यावरील आयात र्निबधासह वाढीव आयातशुल्काचा उतारा शोधण्यात आला. मात्र याच वर्षांत चोरटय़ा मार्गाने देशात येणाऱ्या सोन्याचे बार आणि बिस्किटे जप्त केल्यानंतर त्याची रक्कम २७१.१५ कोटी रुपये होते, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री जे. डी. सीलम यांनी लेखी उत्तरात दिली. विशेष म्हणजे २०१२ मध्ये जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे मूल्य अवघे २२.०१ कोटी रुपये तर २०११ मध्ये ते १५.४१ कोटी रुपये होते. दरम्यान, एप्रिल ते डिसेंबर २०१३ मध्ये देशाची सोन्याच्या बारची आयात १०३ टनाने कमी झाल्याचा दावाही सरकारने केला आहे. सोन्याची नाणी आणि पदक वगळता इतर धातू प्रकारावर बंदी आणण्याचा कोणताही विचार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आयात र्निबध उठवण्याबाबत लक्ष घालू : अर्थमंत्री
नवी दिल्ली: चालू खात्यावरील तूट ४५ अब्ज डॉलपर्यंत राखण्यात यश येत असल्याने सोने आयातीवरील र्निबध दूर सारण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू; याबाबत आपण जातीने लक्ष घालू, असे आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी दिले. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, या प्रकरणात मी केवळ लक्ष घालेल, एवढेच आता सांगू शकतो. सोमवारी जाहीर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत निर्णय होण्याची मोठी अपेक्षा संबंधित उद्योगाला होती. याबाबत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही थेट अर्थमंत्र्यांना पत्र लिहून सूचना केली होती. तमाम रत्ने व दागिने उद्योग क्षेत्राची सोने आयातीवरील शुल्क कमी करण्याची मागणी केंद्रीय व्यापारमंत्री आनंद शर्मा यांनीही केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा