डिमॅट यंत्रणेचा फायदा असा की, शेअर गहाण ठेऊन कर्ज घेणे ही बाब आता खूप सुलभ झाली आहे. डिमॅट स्वरूपातील शेअर तारण ठेवण्याच्या प्रक्रियेला प्लेज (Pledge) असे म्हणतात. मी ज्या बँकेकडून कर्ज घेतले असेल त्या बँकेत डिमॅट खाते उघडेन. ‘प्लेज रिक्वेस्ट फॉर्म’ भरून बँकेला देईन. ज्याला आपण तारण/गहाण असे शब्द वापरतो त्याला बँकेत Pledge असे गोंडस नाव असते. समजा अशोकरावांनी बँकेकडून १०,००० रुपये कर्ज हे दोन वर्षांनी परतफेड करण्याच्या बोलीवर घेतले आहे. त्यासाठी बँकेने सांगितल्यानुसार अशोकरावांनी आपल्या डिमॅट खात्यात असलेल्या टाटा मोटर्सच्या २०० शेअरपैकी ४० शेअर हे तारण ठेवले आहेत. म्हणजे आता अशोकरावांच्या डिमॅट खात्यात एकूण २०० शेअर शिल्लक म्हणून दाखवले जातील; परंतु फक्त १६० शेअर हे ‘फ्री बॅलन्स’ आणि ४० शेअर हे ‘प्लेज्ड बॅलन्स’ म्हणून दिसतील. अर्थात सर्व २०० शेअरवरील लाभांश अशोकरावांनाच मिळणार. जी बँक कर्ज देणार आहे त्या बँकेचेदेखील डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. ‘प्लेज रिक्वेस्ट फॉर्म’मध्ये अशोकराव तसेच बँकेचा डिमॅट खाते क्रमांक लिहिणार. बँक स्वत: डीपी असल्याने त्यांचे डिमॅट खाते अर्थातच त्या बँकेतच असेल. सदर ‘प्लेज रिक्वेस्ट फॉर्म’ बँकेने सीडीएसएलच्या कॉम्प्युटर यंत्रणेत पंच केला की अशोकरावच्या डिमॅट खात्यात ५०० शेअर्स Pledged Balance म्हणून दाखवले जातील की जे पूर्वी Free Balance म्हणून दिसत होते. शेअर अशोकरावच्या खात्याच राहणार आहेत फत्त ते Pledged Balance म्हणजे जणू काही त्याला कुलूप लावून ठेवले आहे अशा स्वरूपात राहतील. अर्थात या मागचा आíथक व्यवहार असा झाला की बँक ही सावकार म्हणजेच धनको (कर्ज देणारी) झाली तर अशोकराव हे कर्जदार म्हणजेच ऋणको झाले!! आता अशोकरावानी बँकेकडे शेअर्स तारण म्हणजेच प्लेज ठेवले आहेत त्यामुळे अशोकरावाना बँक प्लेजर (Pledgor) या नावाने ओळखते. म्हणजे बँक आता प्लेजी (Pledgee) झाली. कारण तिने शेअर्स प्लेज ठेऊन घेतले आहेत. इतका हा सोपा आणि सरळ व्यवहार.
दोन वर्षांनंतर काही कारणाने अशोकराव कर्जाची रक्कम बँकेला परतफेड नाही करू शकले तर काय होईल? बँक अशोकरावांच्या डिमॅट खात्यातून ४० टाटा मोटर्सचे शेअर्स आपल्या डिमॅट खात्यात ट्रान्सफर करून घेईल. म्हणजेच प्लेजीने प्लेजरच्या डिमॅट खात्यातून शेअर्सचे हस्तांतरण करून घेतले. या प्रक्रियेला काँफिस्केशन (Confiscation) किंवा इन्व्होकेशन (Invocation) असे म्हटले जाते. सदर ४० शेअर्स बाजारात विकून त्यातून आपली कर्जाची रक्कम म्हणजेच दहा हजार रुपये वळते करून घेईल. काही रक्कम शिल्लक राहिली तर अशोकरावांना देईल. प्लेज प्रक्रियेत प्लेजर आणि प्लेजी यांची डिमॅट खाती असणे आवश्यक असते तरच हे व्यवहार वर सांगितल्यानुसार होतील. ज्या बँकेने अशोकरावांना कर्ज दिले आहे ती बँक डीपी असल्यामुळे अशोकरावांचे डिमॅट खाते त्या बँकेकडेच असेल हे ओघानेच आले. प्लेजी म्हणून आपले स्वतचे डिमॅट खाते देखील बँक स्वत;कडेच उघडणार. आता या सर्व व्यवहारात बँकेला तीन भूमिका कराव्या लागतात. कर्ज दिले म्हणून सावकाराची भूमिका, तारण ठेऊन घेतले म्हणजे प्लेजी ही भूमिका आणि डिमॅट खाती उघडली म्हणून डीपी ही भूमिका. दुसऱ्या बाजूला अशोकराव पण चक्क ट्रिपल रोल करतात! कर्ज घेतले म्हणून बँक त्याना कर्जदार म्हणते. डिमॅट खाते उघडले म्हणून डीपी (बँक) त्याना डिमॅट खातेदार असे म्हणते तर शेअर्स तारण ठेवले म्हणून अशोकराव प्लेजर झाले!
आणखी एक शक्यता अशी की ठरल्याप्रमाणे अशोकरावानी कर्जाची रक्कम बँकेला परतफेड केली तर काय होते? अशोकराव अनप्लेज (Unpledge) रिक्वेस्ट फॉर्म भरून डीपीकडे म्हणजेच बँकेकडे देतील. डीपी या नात्याने बँक तो फॉर्म सीडीएसएलच्या यंत्रणेत डेटा एंट्री करील. प्लेजी या नात्यातून बँक ती रिक्वेस्ट स्वीकारून मंजूर करील अर्थात कॉम्प्युटरद्वारे. म्हणजे मग अशोकरावांच्या डिमॅट खात्यात जे ४० शेअर्स Pledged Balance म्हणून दाखविले जात होते ते आता Free balance म्हणून दिसतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा