अर्थव्यवस्थेबाबत पंतप्रधानांनी संसदेत केलेल्या आशादायक भाषणानंतर भांडवली बाजारासह परकीय चलन व्यवहारही सप्ताहाअखेर उंचावले. डॉलरच्या तुलनेत रुपया ८५ पैशांनी भक्कम होत ६५.७० पर्यंत झेपावला. तर सेन्सेक्समध्येही २००हून अंशांची वाढ होऊन १८,६०० वर मार्गक्रमण करता झाला. मुंबई निर्देशांकात दिवसअखेर २१८.६८ अंशांची भर पडल्याने निर्देशांक १८,६१९.७२ पर्यंत गेला. सोबतच निफ्टीतील ६२.७५ अंश वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा हा प्रमुख निर्देशांक ५,४१७.८० वर स्थिरावला. बाजार आता गेल्या दोन आठवडय़ांच्या उच्चांकावर आहे.
रुपयाची ढासळती व्यवस्था आणि एकूणच चिंताजनक अर्थपरिस्थितीपोटी विरोधकांनी केलेल्या मागणीप्रमाणे देशाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी संसदेत देशाच्या सद्य अर्थस्थितीबाबत निवदेन केले. आर्थिक सुधारणांच्या दिशेने उचललेले पाऊल मागे न घेण्यासह चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ५.५ टक्के राहील, या त्यांच्या आश्वासनावर भांडवली बाजार तसेच परकी चलनबाजार स्वार झाला.
गेल्या १५ वर्षांत प्रथमच एकाच व्यवहारात तब्बल २२५ पैशांनी उंचावणारा रुपया शुक्रवारी सकाळच्या सत्रात मात्र ७५ पैशांनी घसरला होता. कालच्या ६६.५५ वरून तो या वेळी ६७.३० पर्यंत खालावला. दुपारनंतर पंतप्रधानांनी केलेल्या आश्वासक भाषणानंतर मात्र भारतीय चलन दिवसअखेर ८५ पैशांनी वधारत डॉलरच्या तुलनेत ६५.७० पर्यंत पोहोचले. टक्केवारीतील ही वाढ १.२८ टक्क्यांची होती. दिवसभरात चलन ६५.६९ पर्यंत वाढले होते. तर त्याचा दिवसातील नीचांक ६७.४२ होता.
उशिरा जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर नजर ठेवून गुंतवणूकदारांनी मुंबई निर्देशांकाला दिवसभरात १८,६७९.२६ पर्यंत नेले. शेवटच्या दीड तासांत झालेल्या वाढत्या खरेदीमय वातावरणामुळे सेन्सेक्सने १.१९ टक्क्यांसह सप्ताहाची अखेर केली.
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण
सराफा बाजारात मौल्यवान धातूंचे दर मोठय़ा प्रमाणात घसरलेले पाहायला मिळाले. दोनच दिवसांपूर्वी तोळ्याला ३३ हजाराचा विक्रमी टप्पा गाठलेले सोने दर शुक्रवारी १० ग्रॅममागे एकाच दिवसात तब्बल १,७४५ रुपयांनी कमी झाले. स्टॅण्डर्ड प्रकारच्या सोन्याला तोळ्यासाठी ३१,५२० रुपयांचा भाव मिळाला. गोपाळकाल्यानिमित्त सराफा बाजार गुरुवारी बंद होता. शुक्रवारी चांदीच्या दरातही कमालीचा उतार येताना दिसला. किलोसाठी बुधवारी ६० हजारानजीक गेलेल्या चांदीचा भाव एकाच व्यवहारात सुमारे ४,४४५ रुपयांनी कमी होत किलोसाठी ५५,०२५ रुपयांवर आला.
मौल्यवान धातूचे दर त्याच्या उच्चांकापासून माघारी फिरले असून ते आता सप्ताहातील सुरुवातीच्या टप्प्यानजीक पोहोचले आहेत. आठवडय़ाच्या सुरुवातीलाही सोने १० ग्रॅमसाठी ३१,७६५ रुपयांवर होते, तर चांदीचा किलोचा भाव ५४,७३० रुपये होता. गोकुळाष्टमीच्या दिनी मात्र दोन्ही धातूंनी झेप घेतली. असे करताना सोने तोळ्यामागे प्रथमच ३३ हजारांपुढे गेले, तर चांदीच्या किलोच्या दरानेही ६० हजाराला गवसणी घातली. भांडवली बाजारात तेजी नोंदली गेल्याचा परिणाम सराफा बाजारातील घसरणीवर झाला.