देशातील विविध ३५ बंदर विकास प्रकल्प हे पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्यासाठी ५०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
केंद्रीय बंदरे सचिव राजीव कुमार यांनी गुरुवारी येथे आयोजित पायाभूत सेवा व वित्त विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान सांगितले की, सरकार सध्या ४५ प्रकल्प राबवीत आहे. तसेच ३५ नवे प्रकल्पही मार्गस्थ होण्याच्या टप्प्यात आहेत.
सार्वजनिक तसेच खासगी भागीदारीतून त्यांचा विकास होत आहे. या क्षेत्रातही विदेशी गुंतवणूकदारांचे अर्थसाहाय्य घेतले जात असून त्यामुळे ऊर्जा तसेच रस्ते प्रकल्पांप्रमाणे हे क्षेत्र निधीविना रखडणार नाही, असेही ते म्हणाले.
कुमार म्हणाले की, मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या चौथ्या टर्मिनलची नुकतीच पायाभरणी झाली आहे. या बंदराची माल हाताळणी क्षमता दुप्पट करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याकरिता ८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे.
देशातील सर्व बंदरांना जल-वाहतुकीने जोडणारा सागरमाला प्रकल्प तसेच बंदर-रेल्वे संपर्काकरिता कंपनी उभारणे हे कार्य प्रगतिपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले. सागरमाला प्रकल्पाकरिता फेब्रुवारीपर्यंत आराखडा तयार होईल, असेही ते म्हणाले. देशातील १०६ छोटय़ा-मोठय़ा नद्यांचे जलमार्गामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्नही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader