भाजपप्रणीत आघाडीचा दमदार बहुमतासह लोकसभा निवडणुकांमध्ये झालेला विजय आणि परिणामी केंद्रात स्थिर सरकारची स्थापना होणे ही बाब भारताच्या पत-मानांकनात सुधारासाठी सकारात्मक ठरेल, असे जागतिक मानांकन संस्था मूडीज्ने आपल्या नव्या अहवालात मत व्यक्त केले आहे.
निवडणुकांनी दिलेला सशक्त कौल हे केंद्रात बहुमत असलेल्या स्थिर सरकारची वाट मोकळी करून देणारे ठरले आहे, ज्यायोगे देशापुढील आर्थिक आव्हानांचा सामना करणारी सुयोग्य धोरणे सरकारकडून हाती घेतली जातील, असा विश्वास मूडीज् इन्व्हेस्टर सव्‍‌र्हिसेसच्या या अहवालाने व्यक्त केला आहे. भाजप आघाडीने ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ३३४ जागा जिंकून प्राप्त केलेला विजय हा भारताचे सार्वभौम रूप तसेच उद्योगजगत या दोहोंच्या पतमानांकनात सुधारणेसाठी मदतकारक ठरेल, अशी पुस्तीही अहवालाने जोडली आहे.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या पतमानांकनावर मात्र याचा सुपरिणाम २०१५ सालापासून पडलेला दिसून येईल, असा मूडीज्चा कयास आहे. हंगामी अर्थसंकल्पाने केलेल्या तरतुदीपेक्षा नवे सरकार हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये खूप अधिक भागभांडवल गुंतवेल, असा या अहवालाला विश्वास आहे. शिवाय रिझव्‍‌र्ह बँकेद्वारे नियुक्त पी. जे. नायक समितीने सरकारी बँकांचा कारभार व रचनेत सुधारासाठी केलेल्या शिफारशीही सकारात्मक असल्याचे मूडीज्ने स्पष्ट केले आहे. नायक समितीने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील सरकारचे भागभांडवल ५० टक्क्य़ांच्या खाली आणण्याची, तसेच रिझव्‍‌र्ह बँक आणि अर्थमंत्रालय अशा दुहेरी नियंत्रणाच्या कचाटय़ातून या बँकांची मोकळीक करण्याची शिफारस केली आहे.
निवडणूक निकालांनी गुंतवणूकदारांच्या भावना बळावल्या असून, भांडवली बाजाराची मुसंडी आणि रुपयाची ताजी मजबूत स्थिती हे स्पष्टपणे दर्शविते. निवडणुका उरकल्या असल्याने, उद्योगक्षेत्रांशी संलग्न आणि पायाभूत प्रकल्पांच्या पूर्ततेसंबंधी अनेक निर्णय व धोरणे आता मार्गी लागतील, असा विश्वास मूडीज् वरिष्ठ उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत अधिकारी विकास हलन यांनी व्यक्त केला. त्यांच्या मते, महाकाय प्रकल्पांना मंजुरीत आणि त्यासाठी भूसंपादनात केंद्र व राज्य सरकारांमध्ये समन्वयाच्या भाजपच्या जाहीरनाम्यात नमूद प्रस्ताव अमलात आल्यास गुंतवणुकीला चालना मिळेल.

Story img Loader