लोकसभा निवडणुकीनंतर भारतात येणाऱ्या नव्या सरकारबद्दल अमेरिकेच्या प्रमुख बँकेच्या माजी वरिष्ठ पदाधिकाऱ्यालाही उत्सुकता आहे. फेडरल रिझव्‍‌र्हचे माजी अध्यक्ष बेन बर्नान्के यांनी ती मुंबई-भेटीत उलगडून दाखविली. त्याचबरोबर या नव्या सरकारद्वारेही भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरांचे पतधोरणनिश्चितीचे स्वातंत्र्य अबाधित राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोटक महिंद्र बँकेमार्फत निवडक निमंत्रकांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेन यांनी मुंबईत दोन वर्षांतील दुसरी भेट दिली. या वेळी कोटक महिंद्र बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय कोटक उपस्थित होते. मंगळवारी सायंकाळी उशिरा झालेल्या या कार्यक्रमास आघाडीच्या अनेक उद्योगपतींनी हजेरी लावली.
बेन या वेळी म्हणाले की, तमाम भारतीयांप्रमाणचे देशातील आघाडीच्या लोकशाही देशातील निवडणुकीच्या निकालाविषयी जगभरात उत्सुकता आहे. या प्रक्रियेनंतर केंद्रात नवे सरकार येणार आहे. या सरकारकडूनही डॉ. राजन यांचे स्वातंत्र्य अबाधित राखले जाईल, असे मला वाटते. महागाईसारख्या बिकट संकटातही राजन यांनी यापूर्वीही उत्तम कार्य केले आहे.
केंद्रात भाजपचे सरकार आल्यास राजन यांना अडचणीचे ठरेल, असे वृत्त गेल्या काही दिवसांपासून पसरत आहे. त्यावर खुद्द राजन यांनीही रिझव्‍‌र्ह बँकेबाबत राजकीय मुद्दा महत्त्वाचा नाही, असे स्पष्ट केले होते. तर माजी गव्हर्नर बिमल जालान यांनीदेखील रिझव्‍‌र्ह बँक व राजकारण यांचा संबंध जोडणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. या पाश्र्वभूमीवर बर्नान्के यांचे विधान महत्त्वाचे आहे.
दोन वेळा फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुखपद भूषविणाऱ्या बेन यांनी आपल्या कारकिर्दीत आपणही दोन अमेरिकन अध्यक्षांचा सामना केला, असे नमूद केले. भारतासारख्या परिपक्व अर्थव्यवस्थेत रिझव्‍‌र्ह बँक ही नेहमीच केंद्रस्थानी राहिली असून निर्णयाच्या बाबतही ती स्वतंत्र असणे आवश्यक आहे, या मताचा मी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख होण्यापूर्वी आपणही महागाई नियंत्रणाच्या बाजूनेच होतो, असे नमूद करत बेन यांनी राजन यांना आपण एक अतुलनीय अर्थतज्ज्ञ म्हणून चांगले ओळखतो, असे म्हटले. भारतीय राजकारणाबद्दल आपल्याला अधिक माहिती नसले तरी पतधोरणाकडे पाहण्याचा राजन यांचा दृष्टिकोन नव्या सरकारलाही पसंत पडेल व ते कायम राजन यांना सहकार्य करेल, असेही ते म्हणाले.
फेडरल रिझव्‍‌र्हवर माझी नियुक्ती करणारे जॉर्ज डब्ल्यू बुश असोत की पुनर्नियुक्ती करणारे ओबामा असोत, पतधोरण ही आपली जबाबदारी नाही, अशीच भूमिका घेत त्यांनी मला नेहमी स्वातंत्र्य दिले, असे बर्नान्के म्हणाले. भारतातील महागाईला काबूत आणण्याच्या मुद्दय़ावर राजन यांची पतधोरण कठोर ठेवण्याची भूमिका योग्यच असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader