‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ म्हणजेच आरआरपीआरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने ‘सेबी’ला दिलेल्या पत्रामध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

एनडीटीव्हीने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार संस्थापकांचा समावेश असलेल्या या प्रवर्तक कंपनीने अदानी समूहाला कंपनीच्या मालकीचा काही हिस्सा विकल्याचं सांगितलं. अधिग्रहणकर्त्यां अदानी समूहाच्या माध्यम क्षेत्रात विस्ताराच्या मनसुब्यांना मूर्तरूप मिळण्याच्या दिशेने हे पाहिले पाऊल मानले जात आहे.

एनडीटीव्हीने शेअर बाजाराकडे सुपूर्द केलेल्या पत्रामध्ये, “प्रवर्तक कंपनी असलेल्या आआरपीआर होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या आज म्हणजेच २९ नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये पुढील गोष्टी मान्य करण्यात आल्या… १) सुदिप भट्टाचार्य, संजय पुगालिया आणि सेंथिल सिन्हा चेंगालवरयाना यांची आरआरपीआरएचच्या डायरेक्टरपदी निवड करण्यात येत आहे. ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू असेल. २) प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी आरआरपीआरएचच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे. आज व्यवहार बंद होण्याच्या क्षणापासून हे बदल लागू असतील,” असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> अदानींनी NDTV साठी बोली लावल्याने रवीश कुमार यांचा राजीनामा? मोदींचा उल्लेख करत रवीश म्हणाले, “माझ्या राजीनाम्याची…”

अदानी समूहातील तीन कंपन्यांनी ‘न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड’ अर्थात एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीमधील २९.१८ टक्के भागभांडवलाच्या अप्रत्यक्ष अधिग्रहणानंतर याच वर्षी ऑगस्ट महिन्यात कंपनीमधील आणखी २६ टक्के हिस्सेदारी थेट विकत घेण्यासाठी तिच्या विद्यमान भागधारकांपुढे ५ डिसेंबरपर्यंत खुला प्रस्ताव ठेवला आहे. एएमजी मीडिया नेटवर्क्‍स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडसह विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांनी एनडीटीव्हीचे प्रत्येकी ४ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या १.६७ कोटी भागभांडवली समभागांच्या अधिग्रहणासाठी प्रति समभाग २९४ रुपयांची किंमत देऊ केली आहे. एनडीटीव्हीच्या विद्यमान भागधारकांना उद्देशून आलेल्या या खुल्या प्रस्तावाची जेएम फायनान्शियल लिमिटेडद्वारे ऑगस्ट महिन्यात घोषणा झाली. अधिग्रहणकर्त्यांच्या वतीने या समभाग खरेदीचे व्यवस्थापन जेएम फायनान्शियलकडून पाहिले जात आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : NDTV आणि Adani Deal मध्ये SEBI चा खोडा; जाणून घ्या हे प्रकरण आहे तरी काय?

विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (व्हीसीपीएल) या एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी ‘आरआरपीआर होल्डिंग्ज’ला कर्ज देणाऱ्या आणि आता अदानी समूहाचा घटक असलेल्या कंपनीला, न फेडलेल्या कर्ज रकमेचे समभागांमध्ये रूपांतरणासह एनडीटीव्हीत २९.१८ टक्के हिस्सेदारी मिळविण्यासाठी भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून मंजुरीची मोहोर मिळविणे आवश्यक ठरेल, असा दावा एनडीटीव्हीने यापूर्वी केला होता. मात्र आता कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर बदलल्याने एनडीटीव्हीचा ताबा अदानी समुहाकडे जाण्याचा मार्ग अधिक सुखकर झाल्याची चर्चा आहे.

याच कर्जप्रकरणाच्या संबंधाने २७ नोव्हेंबर २०२० रोजी ‘सेबी’ने आदेश देताना एनडीटीव्हीचे संस्थापक-प्रवर्तक प्रणॉय आणि राधिका रॉय यांना भांडवली बाजारातील प्रवेशाला प्रतिबंधित करताना, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समभाग खरेदी, विक्री किंवा अन्य व्यवहारांस दोन वर्षांच्या कालावधीसाठी मज्जाव केला होता. या प्रतिबंध आदेशाची मुदत २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संपल्यानंतर तीनच दिवसात प्रणॉय आणि राधिका यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर पदाचा राजीनामा दिला आहे.