सोलापूरच्या प्रीसिजन कॅमशाफ्टस् लि. कंपनीने चीनमधील आपल्या विस्ताराचा दुसरा टप्पा हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील अत्याधुनिक मशिन शॉपमधून व्यावसायिक उत्पादनाचा प्रारंभ झाल्यानंतर हा दुसरा टप्पा हाती घेण्यात आला आहे. चीनमधील ग्राहकांना अधिक तत्परतेने सेवा देण्यासाठी ‘प्रीसिजन’ ने येत्या वर्षभरात चीनमध्ये फौंड्री सुरू करण्याची योजना या दुसऱ्या टप्प्यात आखली आहे. येत्या दोन वर्षांत या प्रकल्पातून सुमारे साडेतीनशे कोटींची उलाढाल अपेक्षित आहे.
चीनमधील जेझियांग प्रांतातील हुझाऊ येथे १६ एकर क्षेत्रात सुरू होणाऱ्या या फौंड्रीसाठी निंग्बो शेंगलॉंग ऑटोमेटिव्ह कंपोनन्ट लि. या कंपनीशी भागीदारीचा करार करण्यात आला आहे. याबाबतची माहिती प्रीसिजन कॅमशाफ्टस्चे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली. हुझाऊ येथे स्थानिक प्रशासनाने या नव्या गुंतवणुकीचे स्वागत करण्यासाठी एका शानदार समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात नव्या कंपनीची घोषणा करण्यात आली. या प्रसंगी शेंगलाँग कंपनीचे अध्यक्ष लुओ युलाँग, डीन लुओ,हॅन्सन झँग, प्रीसिजनवतीने अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, संचालिका डॉ. सुहासिनी शहा तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रीसिजनच्यावतीने चीनमध्ये शेंगलाँग कंपनीसोबत भागीदारीमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या या नव्या कंपनीचे नियोजित नाव ‘हुझाऊ पीसीएल शेंगलाँग स्पेशलाईझ्ड कास्टिंग कंपनी’ असे राहणार आहे. अत्याधुनिक स्वरूपाच्या या फौंड्रीची उत्पादन क्षमता वार्षिक चार लाख कॅमशाफ्टस् इतकी असून येत्या दोन-तीन वर्षांत म्हणजे २०१७ पर्यंत फौंड्रीची क्षमता वाढवून ती आठ लाख कॅमशाफ्टस् इतकी केली जाणार आहे. येत्या जूनमध्ये फौंड्रीच्या उभारणीला प्रत्यक्ष प्रारंभ होणार असून जून २०१४ मध्ये उत्पादनाला सुरूवात होणार आहे. या फौंड्रीचे व्यवस्थापन पूर्णत: प्रीसिजन कंपनीकडून पाहिले जाणार असल्याचे यतीन शहा यांनी सांगितले.
चीन सरकारने परकीय गुंतवणकीला चालना दिल्याने त्याठिकाणी परदेशातून येणाऱ्या गुंतवणुकीचे मोठय़ा प्रमाणात स्वागत केले जात आहे. या नव्या उद्योगाला जागा, पाणी, वीज, रस्ते अशा पायाभूत सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. चीनमध्ये दरवर्षी ३५ ते ४० लाख कॅमशाफ्टस्ची मागणी होते. त्यापैकी ४० टक्के कॅमशाफ्टस्ची आयात होते.
याशिवाय प्रीसिजन कंपनीने चीनमध्ये आपला अत्याधुनिक मशिन शॉप प्रकल्प सुरू केला असून तोदेखील जेझियांग प्रांतातील निंग्बो येथे आहे. हा प्रकल्पदेखील शेंगलाँग ऑटोमेटिव्ह कंपोनेन्ट कंपनीबरोबरच भागीदारीमध्ये असून या नव्या कंपनीचे नाव शेंगलाँग पीसीएल कॅमशाफ्टस् लि.असे आहे. या मशिन शॉपची उत्पादन क्षमता दरमहा ५० हजार कॅमशाफ्टस् इतकी आहे. येत्या दोन वर्षांत ही उत्पादन क्षमता दीड लाख कॅमशाफ्टस्पर्यंत वाढविण्याचा मानस असल्याचे यतीन शहा यांनी सांगितले. सध्या या कंपनीतून ‘फोर्ड’ या ग्राहकाला कॅमशाफ्टस्चा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
कॅमशाफ्टस् उत्पादनात प्रीसिजनचे नाव जगात अग्रेसर असून जगातील जवळपास सर्व चार चाकी मोटारींना लागणारे कॅमशाफ्टस् या कंपनीकडून पुरविले जातात. जगातील नऊ टक्के बाजारपेठ प्रीसिजनने काबीज केली असून येत्या तीन वर्षांत २० टक्क्य़ांपर्यंत जागतिक बाजारपेठ काबीज करण्याचा संकल्प प्रीसिजनने सोडल्याचे यतीन शहा यांनी नमूद केले. या वेळी कंपनीच्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, आर. आर. जोशी, माधव वळसे, राजकुमार काशीद,माधव देशपांडे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा