स्वस्त वायूदराचा ग्राहकांना लाभ
सरकारने नैसर्गिक वायू दरात केलेल्या कपातीमुळे मुंबई परिसरात सीएनजी तसेच पीएनजीच्या किंमतीही कमी झाल्या आहेत.
महानगर प्राधिकरण क्षेत्रातील सीएनजीच्या किमती प्रति किलो १.०५ रुपये तर पीएनजीचे दर प्रति क्युबिक मीटरमागे ०.५४ रुपयाने कमी झाले आहेत. या दरांची अंमलबजावणी गुरुवार मध्यरात्रीपासूनच लागू होत आहे.
सीएनजीसाठी प्रति किलो ४१.९० रुपये तर पीएनजीसाठी २५.३१ रुपये प्रति क्युबिक मीटर असे नवे दर असतील. स्थानिक कर याव्यतिरिक्त असतील, असे महानगर गॅस लिमिटेडने स्पष्ट केले आहे.
सरकारने नैसर्गिक वायू दरात ऐतिहासिक तब्बल १८ टक्के दर कमी करत ते ३.८२ डॉलर प्रति एककवर आणून ठेवल्याचे बुधवारीच जाहीर केले होते.
कंपन्यांना मात्र महसुलाची धास्ती
गुरुवारपासूनच होत असलेल्या नव्या इंधन फेरबदलाचा ग्राहकांना लाभ होणार असून वायू उत्पादक व विक्री-विपणन कंपन्यांच्या महसूलावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
३.८२ डॉलर प्रति दशलक्ष मेट्रिक ब्रिटिश थर्मल युनिट दरामुळे देशांतर्गत वायूचे दर ११ ते १६ टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता इंडिया रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने व्यक्त केली आहे. तर डिझेलसारख्या पर्यायी इंधनाच्या तुलनेत हे दर ४० टक्के स्वस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान डिझेलचे दर आठ टक्क्यांनी कमी झाले आहेत. यादरम्यान सीएनजी तसेच पीएनजीचे दर स्थिर होते. मात्र आता तेही १ ऑक्टोबरपासून कमी होत असल्याने गॅस वापरकर्त्यां ग्राहकांची बचत होणार आहे. स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या तुलनेतही पीएनजी (नळाद्वारे होणारा वायुपुरवठा)देखील एक टक्क्यापर्यंत स्वस्त असेल.
नवे दर १ ऑक्टोबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत कायम राहणार आहेत. मात्र यामुळे वायूचे प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या तसेच त्याची विक्री व विपणनव्यवस्था हाताळणाऱ्या कंपन्यांचे महसुली उत्पन्न कमी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. ऑइल इंडिया व ओएनजीसीसारख्या कंपन्यांना प्रत्येकी १३० व १,०८० कोटी रुपयांच्या महसूल ओहोटीला सामोरे जावे लागू शकते, असे इंडिया रेटिंग्जने म्हटले आहे. गेल इंडियालाही चालू आर्थिक वर्षांच्या उर्वरित अर्ध वर्षांत १,९०० कोटी रुपये कमी महसूल मिळेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
असे असूनही शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी दर कपातीचे स्वागत करताना सूचिबद्ध वायू कंपन्यांच्या समभागांना ४ टक्क्यांपर्यंत अधिक भाव मिळवून दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा