सुब्रतो रॉय यांना परदेशवारी खुली
सेबीला २०,००० कोटी रुपये देय असलेल्या सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना अखेर विदेशात जाऊ देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजुरी दिली. याबाबत यापूर्वी दिलेला आदेश सुधारत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. के. एस. राधाकृष्णन आणि जे. एस. खेहर यांच्या खंडपीठाने याबाबत सहाराची पुर्नविचार याचिका ग्रा’ा धरत रॉय यांचे वकिल सी. ए. सुंदरम यांचे म्हणणे मान्य केले. सहारा समुहातील दोन गृहनिर्माण कंपन्यांकडून येणारे २०,००० कोटी रुपये सेबीला दिल्याशिवाय रॉय यांना विदेशात जाता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारच्या याचिकेत दिला होता. त्यात चूक झाल्याचा दावा करत सहाराने याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती बुधवारी केली. मात्र याबाबतची सुनवाणी शुक्रवारी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर हा निर्णय झाला.
सेबी अध्यक्षांची नियुक्ती कायम
ावी दिल्ली: भांडवली बाजार सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांची नियुक्ती ही सरकारने योग्यरित्या केली असून त्याबाबतचे सर्व नियम पाळले गेले असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. एस. एस. निज्जर आणि पी. सी. घोष यांनी सिन्हांच्या नियुक्तीला आक्षेप घेणारी आलेली जनहित याचिका फेटाळून लावली. निराधार मतांवर ही याचिका दाखल करण्यात आली असली तरी केवळ सर्वोच्च व्यक्तीविरुद्ध ती असल्याने आपण ऐकून घेतली, असेही मत न्यायालयाने प्रदर्शित केले. अरुणकुमार अगरवाल यांनी गेल्या वर्षी २६ सप्टेंबर रोजी सिन्हांच्या निवडीविरोधात याचिका दाखल केली होती. यानंतर केंद्र सरकार, सेबी तसेच सिन्हा यांच्या निवडीचा निर्णय घेणाऱ्या अर्थमंत्र्यांच्या तत्कालिन सल्लागार व सध्याच्या राष्ट्रपतींच्या सचिव ओमिता पॉल यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठविली होती. याचिकाकर्त्यांने माजी अध्यक्ष सी. बी. भावे यांना मुदतवाढ टाळून सरकारने सिन्हा यांची नियुक्ती केल्याचा दावा केला होता.
एमसीएक्स-एसएक्सच्या अध्यक्षपदी पिल्लई
मुंबई: एमसीएक्स-एसएक्स या भांडवली बाजाराच्या अध्यक्षपदावर जी. के. अर्थात गोपाल कृष्णन पिल्लई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिल्लई हे माजी केंद्रीय गृहसचिव आहेत. बाजारमंचाने याचबरोबर भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) माजी कार्यरत अध्यक्ष थॉमस मॅथ्यू यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती शुक्रवारी जाहिर केली. कंपनीच्या संचालक मंडळाने या नियुक्तीला गेल्याच आठवडय़ात मंजुरी दिली तर सेबीनेही त्याला होकार दर्शविला असल्याचे एमसीएक्स-एसएक्सने म्हटले आहे. एमसीएक्स-एसएक्स ही फायनान्शियल टेक्नॉलॉजीज समूह प्रवर्तित कंपनी आहे. याच समुहातील एनएसईएल सध्या ५,६०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकदारांच्या थकित प्रकरणात चर्चेत आहे. समूहाचे सर्वेसर्वा जिग्नेश शाह सध्या तपास यंत्रणेच्या फेऱ्यात अडकले आहेत.