भारताला आर्थिक महासत्ता बनायचे तर देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) उत्पादन क्षेत्राचे वाढते योगदान आवश्यक ठरेल आणि ढोबळ अंदाजाने सध्याच्या १५ टक्क्यांवरून हे योगदान २०२२ पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत वाढेल, असा कयास अभियांत्रिकी क्षेत्राच्या निर्यातीतील आगेकूचीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘ईईपीसी इंडिया’ या औद्योगिक संघटनेने व्यक्त केला आहे. अर्थात ऑटोमोबाईल व सुटे भाग, ऊर्जा, औद्योगिक यंत्रसामग्री व मशीन टूल्स, औद्योगिक पुरवठा, सुरक्षा सामग्री, पायाभूत सुविधा व प्रकल्प आणि कल्पकता आदी उद्योगक्षेत्रांचे यात मोठे योगदान असेल असे संघटनेचे म्हणणे आहे.
ईईपीसी इंडियाने १४ ते १६ मार्च २०१३ या कालावधीत ‘इमर्जिग इंडिया सोर्सिग शो’चे आयोजन केले असून, यासाठी युरोपातील चेक प्रजासत्ताकाशी भागीदारी केली आहे. ईईपीसी इंडियाचे अध्यक्ष अमन चढ्ढा यांनी माहिती दिली की, यंदाच्या इमर्जिग इंडिया सोर्सिग शोमध्ये १०० हून अधिक चेक कंपन्या सहभागी होत आहेत. युरोपातील प्रवेशद्वार म्हणून चेक प्रजासत्ताकात भारतीय कंपन्यांनी पाय रोवावेत यासाठी ही एक सुसंधी असेल. भारत आणि चेक प्रजासत्ताकातील द्विपक्षीय व्यापार सध्या १.३ अब्ज डॉलर आहे आणि येत्या दोन वर्षांत तो दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. येत्या दोन वर्षांत अंदाजे ४० कोटी युरोची गुंतवणूक भारतात करण्याचा चेक प्रजासत्ताकाचा विचार असून, महाराष्ट्रात या अगोदरच १० कोटी युरोची गुंतवणूक केली गेली असल्याचे चढ्ढा यांनी स्पष्ट केले.
यंदाच्या इमर्जिग इंडिया सोर्सिग शोमध्ये या व्यतिरिक्त अन्य युरोपीय देश, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, सीआयएस आणि आशियाई देशांतूनही पाहुणे येणार आहेत.
भारतातील अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी व व्यापारासाठी हा शो म्हणजे उत्तम व्यासपीठ ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुमंता चौधरी यांनीही व्यक्त केले आहे. १२ व्या पंचवार्षिक योजनेनेही २०२२ पर्यंत उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील हिस्सा २५ टक्क्यांपर्यंत वाढवून, भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारे ते प्रमुख क्षेत्र बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यातून २०२२ पर्यंत उत्पादन क्षेत्रांतून अतिरिक्त १० कोटींची रोजगारनिर्मितीही होऊ शकेल.

Story img Loader