‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्याचा आमचा ठाम निर्धार असून उद्योग, गुंतवणूक क्षेत्रातील सर्व परवानग्या फास्ट ट्रॅकवर आणण्यात येतील आणि गुंतवणूकदारांसोबत आम्ही भागीदाराची भूमिका पार पाडू, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
 रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्यातील करंजा येथील जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय पोर्ट टर्मिनल आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्टक्चरच्या प्रकल्पाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव एस.के. शर्मा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग जैन, करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा. लि. चे अध्यक्ष निखिल गांधी उपस्थित होते.  उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी एक ई-प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत आहे.
जलद परवानग्यांसाठी  सचिव स्तरिय समिती  स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. ‘मेक इन महाराष्ट्र’चे ध्येय गाठण्यासाठी बंदरे, रेल्वे, रस्ते आदी सर्व क्षेत्रात गुंतवणूकीची आवश्यकता असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. राज्यात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण असून गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या उद्योजकांनी महाराष्ट्राला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
करंजा टर्मिनल आणि लॉजिस्टिक प्रा. लि. चे अध्यक्ष निखिल गांधी यांनी शासनाच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते औपचारिक प्रारंभ झालेल्या या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम आजच प्रकल्पस्थळी सुरु होत आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विविध विभागांकडुन मिळालेले त्वरित सहकार्य आणि वागणूक ही आमच्यासाठी सुखद धक्का होती. दोन वर्षांत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader