नवी दिल्ली : वाढलेले कर संकलन, ‘जीडीपी’तील वाढ आणि निर्मिती क्षेत्रातील सुखावणाऱ्या आकडेवारीपाठोपाठ सेवा क्षेत्रातही तोच कित्ता गिरवत, नोव्हेंबरमध्ये गेल्या साडेदहा वर्षांतील सर्वोच्च गतिमानता नोंदविल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने नमूद केले. व्यवसायांकडे नव्याने आलेला कामांचा ओघ व मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदर या क्षेत्राने आश्वासक वाढ कायम राखली आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘आयएचएस मार्किट इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक नोव्हेंबरमध्ये ५८.१ नोंदला गेला आहे. ऑक्टोबर महिन्यातील सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी म्हणजे ५८.४ असा नोंदला गेला होता. सलग चौथ्या महिन्यात सेवा क्षेत्राची दमदार वाटचाल सुरू आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

नोव्हेंबर महिन्यात, सेवांच्या मागणीत झालेल्या वाढीमुळे सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक गेल्या साडेदहा वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे, असे निरीक्षण ‘आयएचएस मार्किट इंडिया’च्या अर्थशास्त्रज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी नोंदवले.

आगामी काळात देशांतर्गत व्यवसायांना नवीन कार्यादेश व मागणीतील वाढ कायम राहणार आहे. मात्र वाढत्या महागाईच्या दबावामुळे विस्तार मर्यादित राहण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात कच्चा माल व उत्पादन घटकांच्या किमतीत तीव्र स्वरूपाची वाढ झाली आहे. याचबरोबर सरलेल्या महिन्यात इंधन दरवाढ, किरकोळ खर्च, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी आणि वाहतूक खर्च वाढल्याचे अहवालाचे निरीक्षण आहे. वाढत्या महागाईमुळे नोव्हेंबरमधील वाढीचा वेग मंदावला असल्याचेही लिमा यांनी सांगितले.

Story img Loader