पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घालणारा नीरव मोदी आता सीबीआय तसेच अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आहे. जगभरातील वलयांकित व्यक्ती आणि लब्ध प्रतिष्ठितांसाठी आभूषण रचना करणारा हा नीरव मोदी नेमका आहे तरी कोण याचा घेतलेला हा आढावा….

बेल्जियम रिटर्न नीरव मोदी
नीरव मोदी हा ४७ वर्षांचा असून त्याचे वडील हे देखील हिरेव्यापारीच होते. व्यवसायानिमित्त ते बेल्जियममध्ये गेले. नीरव मोदी वॉर्टन महाविद्यालयात शिकत असतानाच वडिलांचा व्यवसाय थंडावला. यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडून बेल्जियममध्ये परतावे लागले. यानंतर नीरव मोदी भारतात आला.

मामाकडून शिकला व्यवसाय
मुंबईत आल्यावर नीरव मोदीने त्याचा मामा मेहूल चोकसी यांच्याकडून हिरे व्यापाराचे धडे गिरवले. कमी वयातच नीरव मोदी कला आणि डिझाईन क्षेत्राकडे आकर्षित झाला होता. युरोपमधील वेगवेगळ्या संग्रहालयांना तो भेट द्यायचा. १८ वर्षांपूर्वी त्याने भारतात हिरे व्यापारात प्रवेश केला.

मित्राच्या सल्ल्यानंतर डिझायनिंगमध्ये
२००८ मध्ये नीरव मोदीला त्याच्या एका मित्राने हिऱ्याचे इयरिंग तयार करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मनावर घेत नीरव मोदी कामाला लागला. नीरव मोदीची फायरस्टार डायमंड ही कंपनी आहे. २०१६ मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंत तरुणांच्या यादीत त्याचा समाशेव होता. नीरव मोदीच्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत आहे. तर दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, सिंगापूर, मकाव, बिजिंग या देशांमध्ये त्याच्या कंपनीच्या शाखा आहेत. लिसा हेडन आणि प्रियांका चोप्रा या नीरव मोदीच्या कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर राहिल्या आहेत.

१. ७३ अब्ज डॉलरची संपत्ती
२०१७ मध्ये फोर्ब्सच्या १०० श्रीमंत भारतीयांच्या यादीत नीरव मोदीचा समावेश आहे. नीरव मोदीची संपत्ती १.७३ अब्ज डॉलर इतकी आहे.

काय आहे घोटाळा? 
काही निवडक खातेदारांच्या फायद्यासाठी बँकेच्या दक्षिण मुंबईतील एका शाखेतून काही फसवे आणि अनधिकृत व्यवहार झाले होते. दोन कर्मचाऱ्यांनी बँकेच्या परदेशातील शाखांमधून फसवणुकीद्वारे नीरव मोदी व त्याच्या कंपन्यांना कर्जउभारणीसाठी बनावट हमीपत्रे जारी करवून घेतली. याच कागदपत्रांच्या आधारे अन्य बँकांनी त्या विदेशातील खातेदाराला मोठी रक्कम कर्ज म्हणून दिली. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याच्या कंपनीविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

Story img Loader