शेअर बाजारातील व्यवहारांचे सार्वत्रिकीकरण, पारदर्शकता आणि गतिमानता ‘डिमॅट’ या संकल्पनेतून घडून आली. एकूणच ‘डिमॅट’बाबत गुंतवणूकदारांमध्ये अनेक गैरधारणा असून त्याचे निराकारण करणारी ही तीन भागातील मालिका..  
१. डिमॅट खाते किती व्यक्तींच्या नावे उघडता येते?
– जास्तीत जास्त तीन व्यक्तींच्या नावे डिमॅट खाते उघडता येते.
२. एकच व्यक्ती एकाहून अधिक डिमॅट खाती उघडू शकतात का?
– एक किंवा अनेक व्यक्ती त्याच नावाने एकाच डीपीकडे किंवा वेगवेगळय़ा डीपींकडे कितीही डिमॅट खाती उघडू शकतात.
३.सर्टििफकेट शेअर्स डिमॅट करण्यासाठीच फक्त डिमॅट खाते उघडता येते का?
– असे काही नाही. आपल्याकडे एकही शेअर नसेल तरी आपण डिमॅट खाते उघडून ठेऊ शकता. त्यात काही शेअर्स नंतर जमा ठेवले पाहिजेत असेही बंधन नाही. भविष्यकाळात ‘आयपीओ’साठी अर्ज करताना या खात्याचा उपयोग होईल.
४. डीपीनी खातेदारांना स्टेटमेंट देण्याचे काय निकष आहेत?
– महिन्यातून एक जरी खरेदी अथवा विक्रीची उलाढाल झाली असेल तरी प्रत्येक महिन्याला स्टेटमेंट देणे बंधनकारक आहे. तसे नसेल तर किमान तीन महिन्यातून एकदा स्टेटमेंट दिलेच पाहिजे.
५. अ, ब आणि क अशा तीन नावांवर शेअर सर्टििफकेट आहे. ब निधन पावला. तर हे शेअर्स कसे डिमॅट करावेत?
– अ आणि क या दोघांनी डिमॅट खाते उघडून उपरोक्त सर्टििफकेट डीपीकडे डिमॅट करावयासाठी द्यावे. मात्र सोबत ट्रान्समिशन रिक्वेस्ट फॉर्म आणि ‘ब’च्या मृत्यू दाखल्याची नोटराइज्ड कॉपी द्यावी.
६. रमेश क. देसाई या नावाने असलेले सर्टििफकेट रमेश कमलाकर देसाई या नावाच्या डिमॅट खात्यात डिमॅट करता येते का?
– वरील दोन नावे असलेली व्यक्ती एकच असेल तर कंपनी /आरटीए योग्य ती पडताळणी करून शेअर्स डिमॅट करील. तथापि सर्टििफकेट व डिमॅट खात्यातील नावे तंतोतंत सारखी असावीत हा डिपॉझिटरीचा नियम आहे तेव्हा डिमॅट खाते उघडताना तशी काळजी घेणे हे जास्त सोयीस्कर.
७. डिमॅट खाते उघडल्यानंतर त्यात एक नवीन नाव टाकता येते का किंवा एकादे नाव वगळता येते का?
– एकदा डिमॅट खाते उघडल्यानंतर त्यातील नावात काहीही बदल करता येत नाही. जरूर पडल्यास खाते बंद करून नवीन खाते उघडावे लागते.
८. माझ्याकडील सर्व शेअर्स मी आणि पत्नीच्या नावावर आहेत. मात्र काही शेअर्समध्ये पहिले नाव माझे तर काही शेअर्समध्ये पत्नीचे नाव पहिले आहे. या स्थितीत दोन डिमॅट खाती उघडावी लागतील का?
– नाही. एकच खाते उघडून त्यात आपले शेअर्स डिमॅट करता येतील. फक्त ट्रान्स्पोझिशन फॉर्म नावाचा एक सुलभ असा फॉर्म डीपीकडे भरून द्यावा लागतो.
९. सीडीएसएलच्या सर्व डीपींची यादी कुठे मिळू शकेल?
–  आपला पत्ता कळवल्यास यादी पाठवली जाईल. तसेच www.cdslindia.com या वेबसाइटवरही यादी उपलब्ध आहे.
१०. माझे स्वत:चे डिमॅट खाते आहे. पण माझ्या व पत्नीच्या नावावर एकच शेअर आहे. तेवढय़ासाठी दुसरे खाते उघडणे जरूर आहे काय?
– होय. किंवा बीएसई दलालामार्फत सर्टििफकेट स्वरूपात पण हा शेअर विकू शकाल अर्थात खरेदीदार मिळाला तरच!
११.सीडीएसएलकडे थेट डिमॅट खाते उघडता येते का?
– नाही. सीडीएसएलच्या डीपीकडे खाते उघडावे लागते.
१२.डिमॅट खात्यात ‘ईसीएस’साठी सूचना देऊनही डिव्हिडंड वॉरंटद्वारे डिव्हिडंड येते असे का?
–  डिव्हिडंडचे पेमेंट कंपनी करते. डिपॉझिटरी नाही. त्यामुळे डिव्हिडंड इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग- ‘ईसीएस’द्वारे थेट बँक खात्यात जमा करायचा की वारंटद्वारे अदा करायचा हा निर्णय कंपनीचा असतो.
तथापि ज्या शहरात ‘ईसीएस’ची सोय आहे तिथे ‘ईसीएस’द्वारेच डिव्हिडंड देण्याविषयी सूचना सेबीने दिलेल्या आहेत ज्याची कार्यवाही क्रमाक्रमाने होत राहील.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा