बँकिंग सेवेच्या निकषांचे उल्लंघन करण्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये सहभागी असणारे अधिकारी स्टिंग ऑपरेशनच्या जाळ्यात अडकले असून, अशा प्रकारच्या बँकांवर त्वरेने कारवाई करण्याची योजना भारतीय रिझव्र्ह बँकेच्या वतीने आखण्यात येत आहे.
अशा प्रकारच्या गैरकृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्या बँकांवर मोठा दंड लादण्याची तरतूद करण्याबाबत कायद्यात सुधारणा करण्याचे काम संसदेचे आहे. मात्र गैरकृत्यांमध्ये सहभाग असणाऱ्या बँकांवर मध्यवर्ती बँक काहीशी सौम्य भूमिका घेईल, ही शक्यता रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी फेटाळून लावली.
बँकांवर होणारी कारवाई कनिष्ठ पातळीवर करण्यात येते, त्यामुळे कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे रिझव्र्ह बँक अशा प्रकारच्या कृत्यांवर कडक कारवाई करणार की सौम्य कारवाई करणार, हे आता सांगणे अकाली ठरेल, असेही सुब्बाराव म्हणाले.
कारवाई करण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल. केवळ प्रसारमाध्यमांद्वारे तपास करीत आहे त्यामुळे रिझव्र्ह बँकेने त्वरेने कारवाई करावी, अन्यथा त्यांची भूमिका सौम्य आहे, असे म्हणता येणार नाही, असेही गव्हर्नर म्हणाले.
कायद्यानुसार प्रचलित प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल आणि तसा करण्यात येत आहे. ठोठावण्यात येणारा दंड कडक अथवा सौम्य आहे असे वाटल्यास त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचा संबंधितांना अधिकार आहे.
काही बडय़ा खासगी बँकांमधील गैरव्यवहार कोब्रापोस्ट संकेतस्थळावरून उघडकीस आणण्यात आले, अशा बँकांच्या व्यवस्थापनाला कारणे दाखवा नोटिसा पाठविण्यात आल्या असून त्यानुसार योग्य ती कारवाईही करण्यात येईल, असेही गव्हर्नर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा