रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी संचालक आर. गांधी यांना डेप्युटी गव्र्हनर म्हणून बढतीचा गुरुवारी निर्णय घेण्यात आला. तीन महिन्यांपूर्वी निवृत्त झालेल्या आनंद सिन्हा यांच्या जागेवर गांधी यांची पुढील तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली.
नव्या बँक परवाना प्रक्रियेची जबाबदारी पाहणाऱ्या सिन्हा यांच्या निवृत्तीपश्चात, गांधी यांच्या या सत्वर नियुक्तीने ही प्रक्रिया आता आणखी गतिशील होणार आहे. रिझव्र्ह बँकेने बुधवारीच तिसऱ्या फळीतील पहिल्या दोन पात्र अर्जदारांची नावे जाहीर केली. गांधी यांच्याकडे बँक चलन व विकास, बिगर बँकिंग वित्तसंस्थांचे पर्यवेक्षण, नागरी बँका तसेच रिझव्र्ह बँकेच्या खर्च व अर्थसंकल्पीय नियंत्रण, माहिती तंत्रज्ञान व विधी विभागाचा कार्यभारदेखील असेल.
रिझव्र्ह बँकेत १९८० मध्ये रुजू झालेले गांधी यांना वित्त क्षेत्रातील तीन दशकांचा अनुभव आहे. रिझव्र्ह बँकेत मुख्य गव्हर्नरांसह चार डेप्युटी गव्हर्नर असतात. त्यामध्ये दोन मध्यवर्ती बँकेत सेवा अनुभव असलेल्यांना नियुक्त केले जाते तर एक राष्ट्रीयीकृत बँकांतून व एक अर्थतज्ज्ञ असतो. बँकिंग क्षेत्रातून आलेले के. सी. चक्रवर्ती हे चालू महिनाअखेर बाहेर पडणार असल्याने हेही पद भरावे लागणार आहे. या व्यतिरिक्त डॉ. ऊर्जित पटेल व एच. आर. खान हे विद्यमान डेप्युटी गव्हर्नर आहेत.
रिझव्र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदी गांधी
रिझव्र्ह बँकेचे कार्यकारी संचालक आर. गांधी यांना डेप्युटी गव्र्हनर म्हणून बढतीचा गुरुवारी निर्णय घेण्यात आला.
First published on: 05-04-2014 at 01:32 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: R gandhi replaces anand sinha as rbi deputy governor