गुंतवणूकदारांची देणी थकविलेल्या नॅशनल स्पॉट एक्स्चेन्ज लिमिटेडच्या विविध मालमत्तांवर तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने गुरुवारी छापे टाकले. यामध्ये कंपनीचे मुख्य प्रवर्तक जिग्नेश शहा यांच्या मालकीच्या मालमत्तांचीही शोध मोहिम घेतानाच तपास यंत्रणेने शहाविरुद्ध तक्रारही दाखल केली. शहा यांच्यासह एनएसईएलचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजनी सिन्हा, मुख्य सर व्यवस्थापक राजीव चतुर्वेदी तसेच अन्य कंपन्यांचे काही अधिकारी यांच्याविरुद्धतही तक्रार नोंदविण्यात आली आहे.
भ्रष्टाचार आणि फसवणूक आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाने याबाबत गेल्या काही दिवसात कारवाईसाठी पुढाकार घेतल्यानंतर विभागाने हे पाऊल उचलल्याचे संचालक रणजित सिन्हा यांनी सांगितले. २००७ ते २०१३ दरम्यानच्या विविध प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. विभागाने गुरुवारीच एनएसईएलच्या विविध १५ मालमत्तांची शोधमोहिम राबविली. यामध्ये शाह तसेच सिन्हा यांच्या मुंबईतील निवासस्थानाचाही समावेश होता.

Story img Loader