भारतीय रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी जागतिक स्तरावर विविध मध्यवर्ती बँकांमध्ये पतधोरणविषयक अधिकाधिक समन्वय व सुसूत्रता ही प्रामुख्याने उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांना संभाव्य विपरीत परिणामांपासून वाचविण्यासाठी आवश्यकच आहे, असे जोरदार प्रतिपादन केले.
विकसित अथवा उदयोन्मुख अशा दोन्ही बडय़ा राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांनी स्वीकारलेल्या धोरणांचे देशांतर्गत इच्छित परिणाम साधायचे झाल्यास, त्यांच्या पतविषयक धोरणांमध्ये अधिकाधिक सुसूत्रता येणे आवश्यकच असल्याचे प्रतिपादन डॉ. राजन यांनी टोक्यो येथे बँक ऑफ जपानकडून आयोजित परिषदेत बोलताना केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पतविषयक धोरणांमध्ये विसंगती ही आपल्या मते चिरंतन विकास आणि वित्तीय क्षेत्र दोहोंसाठी मोठय़ा जोखमीचा स्रोत ठरेल, असे राजन यांनी पुढे बोलताना सांगितले. हा औद्योगिकदृष्टय़ा प्रगत राष्ट्रांनी अथवा उदयोन्मुख अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांनी निर्माण केलेला केवळ प्रश्न नाही तर खरी अडचण ही सामूहिकपणे कृती होण्यात असल्याची त्यांनी पुस्ती जोडली. या समस्येची जाण आपल्याला जितक्या लवकर येईल, तितक्या लवकर आपण चिरंतन वैश्विक विकासाची वाट मोकळी करू, असे ते म्हणाले.
विशिष्ट देशांना प्रचंड प्रमाणात परकीय चलन गंगाजळी बाळगण्यापासून परावृत्त करण्यासाठी सशक्त आंतरराष्ट्रीय बचाव प्रणाली स्थापित करण्याचाही त्यांनी पुरस्कार केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा