देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. रघुराम राजन यांची रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून मंगळवारी नियुक्ती घोषित करण्यात आली. मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व या निमित्ताने पुन्हा एका निष्णात अर्थतज्ज्ञांच्या हाती आले, इतकेच नव्हे तर आजवरच्या २३ गव्हर्नरांमध्ये सर्वात तरुण गव्हर्नर म्हणून राजन यांच्याकडे पाहता येईल. प्रशासकीय सेवेचा गाढा अनुभव घेऊन रिझव्र्ह बँकेत आलेले आणि दोन वेळा मुदतवाढ मिळालेले सुब्बराव अखेर ४ सप्टेंबर २०१३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदाचा अनुभव असणारे राजन हे केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या मर्जीतले मानले जातात. मध्यवर्ती बँकेचे २३ वे गव्हर्नर म्हणून राजन यांच्यासमोर आता डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाला रोखणे, महागाई नियंत्रित करून विकासाला चालना देणे त्याचबरोबर वित्तीय तसेच चालू खात्यातील तूट रोखण्यासाठी नवे पर्याय शोधणे ही आव्हाने असतील. चलन अवमूल्यनाच्या देशावरील विस्तारत जाणाऱ्या संकटाला विद्यमान गव्हर्नर डी. सुब्बराव यांनी जुलै महिन्यात दोन वेळा कठोर स्वरूपाच्या उपाययोजना करूनही आवर घालता आला नसल्याचे दिसून आले आहे.
जगाला जागतिक वित्तीय अरिष्टाने घेरले असताना, म्हणजे २००८ सालात पंतपधानाचे आर्थिक सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून यशस्वी कारकीर्द राहिलेल्या डॉ. राजन यांच्या नियुक्तीबाबतच्या अर्थमंत्रालयाच्या प्रस्तावाला अखेर मंगळवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मान्यता दिली.
५० वर्षीय (जन्म : ३ फेब्रुवारी १९६३) राजन रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून ५ सप्टेंबरपासून आगामी तीन वर्षांसाठी सूत्रे हाती घेतील. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीवरील सर्वात तरुण मुख्य अर्थतज्ज्ञ राहिलेले राजन देशातील बँकांचे नियमन करणाऱ्या संस्थेचे प्रमुख म्हणूनदेखील आतापर्यंतचे सर्वात तरुण गव्हर्नर ठरले आहेत. रिझव्र्ह बँकेचा आगामी मध्य तिमाही पतधोरण आढावा लगेच पंधरवडय़ाने व दुसरा तिमाही पतधोरण आढावा २९ ऑक्टोबर या तारखांना नियोजित आहे. अर्थातच याची तयारी राजन यांच्या मार्गदर्शनाखालीच होईल आणि त्यांच्या पतविषयक नेतृत्त्वाची ती पहिली कसोटीही असेल.
पी. चिदम्बरम यांच्या हाती केंद्रीय अर्थमंत्र्यांचा नव्याने कार्यभार येताच राजन यांचीही मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ऑगस्ट २०१२ मध्ये नियुक्ती झाली होती. पी. चिदम्बरम यांच्या अर्थमंत्रीपदाप्रमाणे राजन यांच्याही मुख्य आर्थिक सल्लागार पदाची वर्षपूर्ती नुकतीच झाली आहे. आर्थिक सल्लागार म्हणून रिझव्र्ह बँक आणि अर्थमंत्रालयाशी त्यांचा थेट संपर्क आला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती झाली तेव्हाच रिझव्र्ह बँकेचे भावी गव्हर्नर म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. वित्तविषयावरील अनेक समित्यांवर ते कार्यरत आहेत.
अर्थतज्ज्ञाच्या हाती अखेर देशाच्या पतधोरणाची धुरा ; डॉ. रघुराम राजन रिझव्र्ह बँकेचे २३ वे गव्हर्नर
देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून कार्यरत असलेले डॉ. रघुराम राजन यांची रिझव्र्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून मंगळवारी नियुक्ती घोषित करण्यात आली. मध्यवर्ती बँकेचे नेतृत्व या निमित्ताने पुन्हा एका निष्णात अर्थतज्ज्ञांच्या हाती आले,
Written by badmin2
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 07-08-2013 at 01:35 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan appointed as next rbi governor